Sunday, February 18, 2024

वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्याला व्याजवाडी या गावी पोहचावे लागते. व्याजवाडी हे वैराटगडाच्या पायथ्याचे गाव आहे. लालपरी ची वाट पाहत आता मी गणेश खिंडीत थांबलो होतो. १२ वाजता गाडी येणार असे स्थानिकांनी सांगितले. पण वेळेवर येईल ती लालपरी कसली. ती आली १२:३० वाजता. आणि आता माझी वाटचाल आजच्या दिवसातल्या तिसऱ्या गडाकडे चालू झाली होती. हि लालपरी भुईंज या बस स्थानकावर पुन्हा जाणार होती. पण मला व्याजवाडी ला जायचे होते. मी गाडीत बसल्यावर तसे तिकीट काढताना कंडक्टर काकांना विचारले तर त्यांनी सांगितले कि तुम्ही कडेगाव पूल या बस थांब्यावर उतरा आणि तिथून पुढे व्याजवाडी साठी जावा. आणि कडेगावपूल हे तिकीट हातात दिल आणि कंडक्टर पुढे सरकले.

मी आता मस्त खिडकी जवळची जागा हेरून बसलो होतो. ग्रामीण साताऱ्याचा मस्त अनुभव मला खिडकीतून दिसत होता. लहानशी घरे, समोर आंगण त्याच्या बाजूला असतील तर काही वेळेस जनावर किंवा लहानगे एकमेकांशी आनंदाने खेळणारे शिवाय भर उन्हात आल्हाद दायक असा हिरवा निसर्ग. कारण हा किल्ला वाई पासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर आहे.

साधारण ०१:१५ वाजता मी कडेगाव पुलावर पोहचलो. थोड आजूबाजूला पाहिलं आणि मला दिशा दर्शक पाटी दिसली व्याजवाडी. कडेगाव पूल ते व्याजवाडी अंतर साधारण ३-५ किलोमीटर आहे. म तिथे थांबलेल्या टम-टम वाल्यांना विचारल व्याजवाडी येणार का? कुणीच तयार नाही झाले. म काय आपला चालत निघालो. थोड पुढे गेल्यावर मला एक मुलगा दिसला मी त्याला विचारल दादा व्याजवाडी ला जायचं आहे सोडणार का? तो म्हंटला मी इथेच जात आहे पुढे तरी माझ्या जागेपर्यंत सोडतो अस म्हंटला. मी पण त्याच्या मागे बसलो अगदी २-३ मिनिटात त्याच घर आल आणि मला पुन्हा चालत जाव लागल. थोड पुढे जाताच एक काका आले मी त्यांना देखील हात दाखवला पण ते थोड पुढे जाऊन थांबले. म मी पळत तिथे गेलो आणि त्यांना म्हंटल काका व्याजवाडी ला जायचं आहे. ते म्हंटले कुणाकड मी म्हणलो काका गडावर जायचं आहे. ते म्हंटले बर बस. म काय आता ते मला पूर्ण गडाच्या पायथ्याला सोडणार होते कारण त्याचं घर व्याजवाडीतील शेवटच घर होत. त्यांच्या घरा समोरूनच पायवाट जात होती. मला ते म्हंटले जोडीदार आणायचं कुणीतरी एकट का फिरतोय. सांगितल म त्यांना पण मधला अधला दिवस असल्याने सुट्टी नव्हती मित्रांना. १० मिनिट साधारण आमचा सोबत प्रवास झाला. दुपारचे १:३० वाजत होते. काकांनी मला सोडल आणि पाऊलवाट दाखवली आणि हे पण सांगितल कि जरा जपून जा कारण कालच वणवा पेटला होता. म मी पण जरा सावध झालो गावातून कुणी गडावर येणार आहे का पाहिलं, एक छोटा मुलगा पण दिसला त्याला देखील विचारल पण तो देखील नाही म्हंटला. त्यामुळे आता मी एकट्याने किल्ला सर करण्यास सुरवात केली.

मी जरा जसा पुढे जात होतो तस तस मला काल पेटलेल्या वणव्याच्या खुणा जाणवत होत्या. बऱ्याच जागा अजूनही धुमसत होत्या. त्यातून मार्च महिना आणि दुपारचे कडक ऊन. हळू हळू मी आता वर जात होतो. अधून मधून मागे गावाकडे सुद्धा पाहत होतो आजू बाजूचा परिसर न्याहाळत होतो. काल वणवा पेटल्याने काही ठिकाणी मळलेली पाउल वाट अधून मधून धूसर होत होती. ह्या आधी साधारण ५७ किल्ले पाहून झाले असल्याने अनुभव गाठीशी होता. त्यामुळे थोड थांबून नक्की वाट हीच आहे का हे तपासून पुढे जात होतो. पण किल्ला आता अर्धा झाला होता आणि मला आता वाट नक्की सापडत न्हवती. मी एकदा डाव्या बाजूने वाटेचा अंदाज घेत पुढे जात होतो पण ती वाट पुढे संपत होती मग मी पुन्हा मागे आलो आणि जिथून डावीकडे वळलो होतो तिथून आता सरळ जायचे ठरवले. आणि गड समोर दिसत आहे असा पूर्ण चढ चढू लागलो. पुढे काय वाढून ठेवले आहे हे अजिबातच माहिती नव्हते.

पहाटे घर सोडल्यामुळे सोबत फक्त २ लिटर पाणी, ३ सफरचंद आणि २ संत्रे, २ चॉकलेट्स आणि १ बिस्किटचा पुडा होता. त्यातून ह्याच दिवशी २ किल्ले हे आधीच झाले असल्याने अर्थात २ सफरचंद आणि थोडे पाणी सुद्धा संपले होते. उन्हाळा असल्याने मी जास्त पाणी पेयला हवे होते हे माझे चुकले आणि त्या चुकीची जाणीव मला चांगलीच भोवली.

रखरखीत उन्ह आणि तीव्र चडण यामुळे माझ्या डाव्या पायाला वात येण्यास सुरवात झाली होती. मला मळलेली पाउल वाट हि सापडत नव्हती. तरीही मी हळू हळू पाउल पुढे टाकत होतो पण अगदी पुढच्या काही मिनिटातच मला माझे डावे पाउल काही केल्या हे हलवता येईना. मग मी शांत खाली बसलो. पाणी पिल. २-३ मिनिट विश्रांती केली आणि पुन्हा गड चढाई ला सुरवात केली पण पुन्हा अगदी काही अंतर पुढे गेलो असता माझ्या आता उजव्या पायाला सुद्धा बेक्कार वात आला आणि मी जागीच खाली बसलो. डाव्या पाया पेक्ष्या ह्या पायाला जास्त वेदना होत होत्या आणि आता त्याच बरोबर माझा डावा पाय सुद्धा वात पकडू लागला होता. मला आता पूर्ण हालचाल करता येत नव्हती गडाच्या आड वाटेवर मी एकटाच होतो. गडावर कुणी आहे का नाही माहिती नव्हत. मी आता पूर्ण खचलो होतो, आधी मी पायातले बूट मोजे दोन्ही काढले, bag काढून बाजूला टाकली. मनात देवाचा धावा करू लागलो. थोड पाणी पिल. बिस्किटचा पुडा खाल्ला पण माझे तोंड अजून कोरडे पडले आणि काही सुचेनासे झाले. आता साधारण ३ वाजत असावेत. मला काय कराव हे अजिबात सुचत नव्हत कारण दोन्ही हालचाल आता जवळ जवळ थांबली होती. मी ज्या जागी पडलो होतो तिथून आजूबाजूला कोणतीच वाट दिसत नव्हती किंवा गाव सुद्धा दिसत नव्हते. मी माझी bag बघितली त्यात शिट्टी आहे का नाही बघितल. पण नेमक ह्या ट्रेक च्या वेळेस मी शिट्टी घरी विसरल्याचे लक्ष्यात आले. शिवाय मी काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. काल लागलेल्या वणव्याने पूर्ण डोंगर देखील काळा दिसत होता. त्यामुळे मी कुणाच्या नजरेस पडणे चांगलेच अवघड झाले होते. अर्धा तास जवळ जवळ मी एकाच जागेवर एकटाच बसून कळवळत होतो. थोड्यावेळाने जरा बरे वाटायला लागले . मनात म्हंटले आता मदत हि मागायलाच हवी. म मी जरा मोकळी जागा शोधायचा प्रयत्न केला कि जिथून मला गाव किंवा रस्ता दिसेल अशी जागा शोधली. मग ज्या काकांनी मला व्याजवाडी पर्यंत आणले ते मिलिंदभाऊ मी त्यांना हाक मारू लागलो. ज्या छोट्या मुलाला गडावर येतो का विचारल होत त्याच नाव लक्षात होत त्याला सुद्धा बऱ्याच हाका मारत होतो. पण माझा आवाज कदाचित गावात पोहचत नव्हता. शिवाय माझ्या तोंडाला सुद्धा कोरड पडलेली च होती. जवळ जवळ मी ३० मिनिट गावातून मदत मागण्यासाठी ओरडत होतो पण मला काही मदत मिळेना हे लक्षात आल. म विचार केला आणि १०० नंबर वर फोन लावला. आयुष्यात पहिल्यांदा हा नंबर लावला असावा. फोन उचलला गेला मी माझे नाव सांगितले आणि मी वैराटगडावर अडकल्याची माहिती दिली पण आधी तिकडून फोन उचलून माझीच उलट तपासणी झाली आणि का गेलात कशाला गेलात कोण आहे सोबत वगैरे-वगैरे. पण उत्तर काहीच नाही आणि फोन ठेऊन दिला. मी पुन्हा फोन लावला तर तिकडून एक नंबर देण्यात आला आणि तो वाई पोलीस स्टेशन चा होता. तिथे फोन लावा अस सांगितल. मी तो फोन लावला तिकडून सांगण्यात आल थोड्यावेळ फोन चालू ठेवा त्या प्रमाणे मी फोन चालू ठेवला पण तिकडून फोन कट करण्यात आला. ह्यात मध्ये मध्ये मी गावात हाक मारत होतो. पण गावातून हि काही उत्तर येईना. मग थोड मी शांत बसलो आणि लक्षात आले कि ट्रेक क्षितिज ह्या संस्थेतील एक कार्यकर्त्याचा संदेश मुठे नंबर होता. त्याने एकदा अस लिहल होत कि कधी कुठे ट्रेक मध्ये अडचण आली तर कळवा मला ते आठवले आणि मी त्याला फोन लावला. तो दादा मुंबई ला राहतो. मी त्याला फोन केला आणि सर्व काही सांगितले. त्याने मला फोन वर धीर दिला आणि महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे जे काम बघतात मिश्राम सर त्यांचा नंबर दिला. मी त्यांना फोन लावला. त्यांनी माझी सर्व माहिती घेतली आणि त्यांनी पण मला बराच धीर दिला. शिवाय सगळ काही निट आणि सावकाश सांगितल. पाणी पुरेसे आहे का? खायला आहे का काही? मोबाईल किती चार्ज आहे? गाव दिसत आहे का? रस्ता दिसत आहे का? मी पण सर्व काही आहे अस सांगितल. कारण आधीचा ट्रेकिंग चा अनुभव होता त्यामुळे मी माझे सर्व जपून वापरत होतो. माझ आणि त्या दादा च बोलण झाल त्यांनी मला सांगितल धीर सोडून नका पुढचे नंबर पाठवतो किवा तुम्हाला फोन येतील ते उचला. आणि live लोकेशन share करा. त्यानुसार मी केल.

मला पुढच्या १५ मिनिटात साधारण ४-५ फोन आले होते कुठे आहात नीट राहा शांत राहा आम्ही पोहचत आहोत अश्या स्वरूपाचे. पण ह्यात पोलिसांचा फोन नव्हता बर. फोन वर मी कुणाशी बोलत आहे हे मलाही ठाऊक नव्हते पण सर्वच जण खूप प्रेमाने आणि व्यवस्तीत बोलत होते. तेव्हा मला काळाल कि महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम network किती मोठ्ठ आणि चांगल आहे. कारण मला वाचवण्यासाठी दोन टीम निघाल्या होत्या. त्यातली एक सातार ची आणि आणि एक महाबळेश्वर ची होती. हे एकून मला धीर मिळाला होता. पण मी गावात बघून हाक मारतच होतो त्यामुळे मी ज्या वाटेने वर आलो होतो त्याच्या अलीकडच्या वाटेने ४ तरुण मला वर येताना दिसत होते. ते स्थानिक दिसत होते. कदाचित त्यांना हि मी दिसत होतो. पण मला ते मदत करतील अस वाटत नव्हत. आता मला चौकीतून फोन आला आणि चौकशी चालू झाली मी त्यांना सांगितल मी मला महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे मिश्राम सर मदत करत आहेत हे एकून त्यांनी फोन ठेवून दिला. साधारण ४:३० वाजता गावातून मला एक तरुण अक्षय जाधव नावाचा मी ज्या वाटेने वर आलो त्या वाटेने येताना दिसला. मी मनोमन देवाचे आभार मानले. त्या आधी त्याने मला फोन सुद्धा केला होता. आणि तो झपा झप पाउल टाकत माझ्या दिशेने येत होता. तो मला दिसावा म्हणून तो मुद्दाम लाल रंगाचा शर्ट घालून आला होता. हे मी मिश्राम दादा ला सांगितल कि मला गावातून मदत मिळत आहे. तुम्ही बाहेरून पाठवू नका कुणाला. ते हि ठीक आहे म्हंटले आणि खाली सुखरूप पोहचलात कि सांगा नक्की. आता अक्षय दादा ३० मिनिटात माझ्याकडे पोहचला होता. अधून मधून मी त्याला माझी दिशा सांगत होतो. आणि अखेर माझी आणि अक्षय दादा ची भेट झाली मला आता चांगलाच धीर आला होता. शिवाय मी म्हगाशी म्हटल्या प्रमाणे दुसर्या वाटेने जे तरुण दिसत होते त्यात मारुसरे दादा आणि त्याने मित्र होते त्यातील एक दादा भारतीय सैन्यात नोकरी ला होता. हे आता अक्षय दादा शी लांबून बोलत होते कारण ते अजून मी असलेल्या ठिकाणी आलेले नव्हते. पण मी आणि अक्षय दादा ने आता गड उतार होयला सुरवात केली होती. पण वरून मारुसरे दादांनी आम्हाला थांबायला सांगितल तर अक्षय दादा म्हंटला कि पुढ या मोकळ्यात थांबतो. तोवर अक्षय दादा बऱ्याच आड वाटांनी मला हळू हळू खाली नेत होता. काही ठिकाणी तर अगदी ९ - १० फुटी सरळ उतरव लागत होत. दादा आधी पुढे जात आणि आग मला म्हणयचा या इकडून असे सांगत होता.

अखेर मी जिथं रस्ता चुकलो होतो त्या ठिकाणी आम्ही पोहचलो आणि आता दुसऱ्यावाटेने आलेले मारुसरे दादा आणि त्यांचे मित्र भेटलो. त्यांनी माझी सगळी चौकशी केली. मी कुठून आलो कसा अडकलो. त्यांनी माझ्यासाठी एक पाण्याची बाटली एक बिस्कीट चा पुडा सुद्धा आणला होता. तो मला देऊ केला. त्यांनी म अक्षय दादा ची पण चौकशी केली तो कुणाचा कुठ राहतो असे सगळे. गडच्या अंतिम टप्प्यावर त्यांनी माझा एक video सुद्धा काढला. मी कुठून आलो कसा अडकलो आणि मला ह्या सर्व जणांनी कसे वाचवले शिवाय माझ्या आधार कार्ड चा pic सुद्धा घेतला. मला त्यांनी कारण सांगितले कि ४-५ महिन्या आधी दोन तरुण असेच गडावर गेले आणि गडावरील मंदिरात आत्महत्या केली. म्हणून हा सारा खटाटोप. पण मी त्या सर्व दादांना विनंती केली कि कृपया हे कुठे viral करू नका कारण ह्या सगळ्यात मला घरून फोन आले होते आणि मी घरी ह्यातल काहीच सांगितल नव्हत. ते पण म्हंटले ठीक आहे. आणि हे सगळ झाल्यावर गावात पोलिसांनी कालवल कि गडावर एक तरुण अडकला आहे ते.

आता माझा गड उतार पूर्ण झाला होता. मी महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे मिश्राम दादा ह्यांना सांगितल मी पूर्ण गड उतार सुखरूप झालो आहे आणि त्यांचे खूप खूप आभार देखील मानले. पूर्ण गावात आता माझी चर्चा चालू होती. सगळ्या काकू, काका मला म्हणत होते काय दादा जोडीदार आणायचं कुणीतरी एकट येऊ नये. मी सगळ्याचं ऐकत होतो. आणि आता मी मिलिंद भाऊ च्या घरी चहा घेतला. सर्वांनी जेवण्यासाठी थांब्याचा आग्रह केला पण तो टाळून पुन्हा नक्की येईन अस सांगून अक्षय दादा आणि मित्रांनी मला बस स्थानकावर सोडल बस मिले पर्यंत थांबले सुद्धा. आणि सांगितल कि दादा पुन्हा एकटे येऊ नका.मला घरी पोहचायला रात्रीचे १०:३० झाले होते. साधारण ३-४ महिन्या नंतर मारुसरे दादा आणि सर्व मित्र ते आर्मी मधल्या दादाला सोडायला पुण्यात आले होते ज्यांनी मला वाचवल होत ते सगळे माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांना बाहेरच कल्पना दिली होती कि तो प्रसंग मी अजून घरी सांगितला नाहीये. तर ह्या मित्राने सर्व काही सांभाळून घेतल होत तेव्हा. मग आई ने मला विचारल होत काय रे हे कसे काय इतके मित्र झाले. म्हंटल गावात गेलो कि होतात मित्र अशी थाप पण मारली होती.

हा अनुभव माझ्या घरच्यांना सुद्धा अनुभव माहिती नव्हता पण हे वाचल्यावर मला पुढे ट्रेक ला सोडतील कि नाही शंकाच आहे.आणि मी पण आता मनाशी निश्चित केल कि कोणत्या गडावर एकट नाही जायचं. आणि तुम्ही देखील असे धाडस करू नका. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चा नंबर खाली देत आहे. माझ गडावर जाण झालच नाही त्यामुळे वरील img गुगल वरून घेतला आहे.

7620230231 महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम

Friday, January 19, 2024

पुण्यातून किल्ले चंदन-वंदन ला कसे जाल (How to Reach Chandan-Vandan fort from Pune)



हि पोस्ट लिहायला खर तर तसा चांगलाच उशीर झाला आहे पण असो. बरेच दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि solo trek पण केला नव्हता. एक दिवस सुट्टी मिळाली तारीख होती २९ मार्च २०२३. मग काय आदल्या दिवशी रात्री साताऱ्या लागत असलेल्या चंदन-वंदन या जोड गोळीची निश्चिती केली. इंटरनेट आणि पुस्तकात ज्याबद्दल वाचल होत ते आज पाहायला मिळणार. खूप उत्सुकता होती. साधारण पहाटे ५ वाजता घर सोडल आणि प्रवास चालू झाला.थोडा वेळ वाट पाहून शनिवारवाडा ते स्वारगेट अशी PMT मिळाली. स्वारगेट बस स्थानकामध्ये साधारण ५:३० वाजता पोहचलो, तिथे कळले कि साताऱ्या ला जाणारी गाडी ६:०० वाजता निघणार आहे. मग गाडी मध्ये बसून गाडी निघायची वाट पाहत होतो. वेळ होताच गाडी निघाली आणि आता खऱ्या अर्थाने माझा गडांच्या कडे जाणारा प्रवास चालू झाला होता.

साधारणपणे इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.हि जोड गोळी गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले या प्रकारामध्ये मोडतात. किल्य्याची उंची समुद्र सपाटीपासून ३८०० फुट असावी.

तिकीट काढतानाच कंडक्टर यांना सांगितल होत कि भुईंज हे गाव आल कि सांगा कारण हे गाव साताऱ्या पासून २० किलोमीटर अलीकडेच आहे त्याच बरोबर मी सुद्धा लक्ष ठेवूनच होतो.सकाळी ८ च्या सुमारास मी भुईंज या बस स्थानकावर उतरलो. बेलमाची या गावी जाणाऱ्या बस ची चौकशी करू लागलो. डेपो मधून कळल कि येईल बस. म काय जरा आजूबाजूला पाहतच होतो इतक्यात एक काका भेटले, मी त्यांच्याकडे चौकशी केली बेलमाची गावी कसे जाता येईल? त्यावर ते म्हंटले मी बेलमाचीचा च आहे कुणाकड आलात? म मी म्हणतलो काका गडावर जायचं आहे चंदन-वंदन. म त्यांनी बघितल कि गावातून कुणी भुईंज ला येणार आहे का, जरा २-३ फोन लावले पण कुणी येणार नव्हते. पण त्यांनी सुचवले कि बेलमाची पेक्षा कलंगवाडी या गावी जा इथून गणेशखिंडीपर्यंत थेट बस जाते आणि गणेशखिंडीतून किल्ला अगदी तास-दीड तासात होतो.जस काकांनी सांगितल्या प्रमाणे एका टमटम ने कलंगवाडी पर्यंत सकाळी ८:४५ वाजता पोहचलो. इथून गणेशखिंडी कडे जाणारी बस लगेच आली आणि ९ वाजता मी गणेशखिंडीत पोहचलो देखील. उतरताना कंडक्टर यांना परतीच्या बसची माहिती घेऊन ठेवली. साधारण १२ वाजता असेल अस सांगितल आणि सगळ्यात शेवटची बस ५ वाजता असते.

११:३० पर्यंत दोन्ही किल्ले पहायचे हे मनाशी नक्की केल आणि गड चढाईस सुरवात केली. वंदन हा किल्ला गणेशखिंडी पासून लांब असल्याने आधी तो करायचा ठरवल. अगदी खडी चढाई असल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने चढाई करताना जरा दमणूक होत होती. पण मला १२ पर्यंत दोन्ही किल्ले पाहून पूर्ण करायचे होते. अगदीच कमी विश्रांती घेऊन सुमारे १०:२० वाजता माझा वंदन किल्ला हा पाहून झला. मधला अधला दिवस असल्याने गडावर फक्त मी एकटाच होतो. गडाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच तिथे एक शिलालेख नजरेस पडतो. गडावर काही पडके अवशेष आहेत काही ठिकाणी त्याला नावे दिली आहे तर काही कळत नाहीत नक्की काय असावे.सर्वात प्रथम गडावर आपल्याला चुन्याचा घाणा नजरेस पडतो, पडक्या अवस्थेत काही पायऱ्या आहेत. वंदनेश्वराचे अगदी लहानसे मंदिर आहे. थोड वर चढून गेलं की इथे पूर्वी गडाची वस्ती असावी. एक पाण्याच टाक देखील आहे पण ह्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच दारुकोठार किंवा धान्यकोठार अश्या साठी सुद्धा गडावर जागा असल्याचे दिसते.पूर्वी ह्या गडाला बालेकिल्ला असावा असे भासते. शिवाय एक दर्गा देखील आहे.

प्रवेशद्वार

उर्दू मधील शीलालेख

चुन्याचा घाणा

धान्यकोठार / दारुकोठार

वंदनेश्वर

वंदन गडप्रमाणे चंदन गडावर एक चंदनेश्वराचे मंदिर आहे यातील दोन्ही पिंडी पाच लिंगाच्या आहेत. एक विहीर आहे यातील पाणी काढण्यासाठी आपल्याकडे दोरी असणे आवश्यक आहे विहिरीत केवळ पावसाळ्यातच पाणी असते. पाच वडाच्या झाडांचे एक झाड म्हणून याला पाचवड असे हि म्हणले जाते. ह्या गडावर फारसे अवशेष नाहीत त्यामुळे किल्ला अगदी सहज पाहून होतो. दोन्ही गडांच्या चारही बाजूने नैसर्गिकच खडी चढाई असल्याने गडांना वेगळी तटबंदी नाही.

दोन्ही गड आता ११:१५ वाजताच बघून झाले होते अर्धा दिवस अजून शिल्लक होता. मग काय कराव असा विचार गड उतरताना केला मग गुगल गुरुजींची मदत घेतली आजू बाजूला अजून कोणते किल्ले जवळ आहेत का पहाव लगेच होण्यासारखे तर वैराटगड साधारण ह्याच रस्त्यावर आहे आणि लगेच होऊ शकतो. मग काय गणेशखिंडीत पोहचलो आणि बस ची वाट पाहत बसलो. नेहमी प्रमाणे लालपरी ने वाट पाहायला लावली आणि १२ ची गाडी १२:३० वाजता आली. बस मध्ये चढताच कंडक्टर काका ना विचारल बस व्याजवाडी (व्याजवाडी हे वैराट गडाच्या पायथ्याचे गाव आहे) पर्यंत जाईल का तर त्यांनी अस सांगितल कि कडेगाव पुलावर उतरा तिथून ५ किलोमीटर व्याजवाडी आहे तिथून वेगळ्या गाडीने तुम्हाला जाव लागेल. आणि आता माझा प्रवास हा वैराट गडाच्या दिशेने प्रवास चालू झाला होता.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
स्वारगेट ते भुईंज (S.T) १२०/-
भुईंज ते कलंगवाडी १५/-
कलंगवाडी ते गणेशखिंड २०/-
एकूण खर्च १५५/-

परतीचा एकाचा खर्च :
भुईंज ते स्वारगेट १२०/-
एकूण खर्च १२०/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
चंदन वंदन हे किल्ले चढाई ला अवघड नाही.
किल्ल्यावर राहण्याची सोय केवळ दर्ग्यातच होऊ शकते.
गडांवर केवळ पावसाळ्यात पिण्याचे पाणी असते.
गडावर जेवणाची सोय हि आपल्यालाच करावी लागते.
स्वारगेट वरुन साताऱ्याच्या दिशेने सारख्या बसेस आहेत पण भूईज येथून मात्र पूर्ण पुढच्या गाड्यांची चौकशी करून घ्यावी आणि मगच पुढच्या प्रवासाला निघावे.

Sunday, July 2, 2023

शब्द अपुरे आहेत

खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत,
जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे.

शब्द माझ्या मनात आहेत, भावना तुझ्या मनात आहेत,
पायातील पैंजण तुझ्या नाजुक स्वरांचे गीत आहेत.

होता स्पर्श तुझ्या हातांचा प्राजक्त सुध्दा फुलत आहेत,
लांब सडक केसांतुनी भर उन्हात सुध्दा सावली देत आहे.

नाजुक तुझ्या नेत्रांमधून अजूनही मला शोधत आहेस,
कोमल तुझ्या ओठांवरी अजूनही माझेच नाव आहे.

खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत,
जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे.

Friday, June 16, 2023

आठवण....



आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची,
शोधूनी सह्यवाटा संपती, 
ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची.... 

घनदाट लांब केसातूनी, फुलांच्या माळा गुंफती
सौंदर्याने तिच्या सह्याद्रीतील करावी सुध्दा लाजती

मधुर असे ते बोल तिचे, गोजीरे गीत गाती
रानातील पक्षी सारे, बोल तिचेच ऐकती 

पाणीदार डोळे तिचे, शब्दानं विनाच बोलती
स्पर्श होता तिचा हाताला, अंग सारे शहारती

नजरेस नजर भिडता, मला घायाळ करती
ठाऊक नाही काही, तरीही ती लाजती

मिठीत घेता तिला, शिंपल्यात मोती निर्मिती 
मोत्यांच्या माळातुनी, सुरेख हार निर्मिती 

आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची, 
शोधूनी सह्यवाटा संपती, 
ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची.....

Tuesday, April 26, 2022

गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा



गंध तो मातीचा
स्पर्श तिच्या हातांचा

शहारून कळ्या साऱ्या
बहरती पुन्हा पुन्हा

शब्द ते मधुर सारे
थबकती ओठांवरी

आकाशी पक्षी हे
दसदिशास भटकती

निळ्याशार पाण्यातुनी
इंद्रधनू हे प्रतिबिंबती

मृगनयनी डोळे तिचे
हृदयास मोहून जाती

रेशमी केसांनमधुनी
प्राजक्त च्या माळा गुंफती

चाहूल होता तिची
आठवणी मनात कल्लोळ करती

हातात हात तिचा
कोमल अश्या आठवणींचा

गंध तो मातीचा
स्पर्श तिच्या हातांचा

Friday, January 21, 2022

वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात.

माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते.

मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे
१) कळकराई सुळका
२) वानरलिंगी सुळका
३) वजीर सुळका
४) बाण सुळका
५) नवरा- नवरी सुळका

साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करायची.

आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून मला कळले की २५ डिसेंम्बर २०२१ रोजी इंद्रप्रस्थ ट्रेकर ह्याला गवसणी घालणार आहेत आणि मी क्षणाचाही विलंब न करता सांगितले की ह्या मोहिमे साठी मी सुद्धा इच्छुक आहे. हे मला साधारण १ ते दीड महिना आधी कळाले होते म तसे मी आमच्या ऑफिस मध्ये सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवले होते. पण घरी मी १० दिवस आधी सांगितले कारण वजीर सुळक्याचे फोटो पाहून ते मला सोडणार नाहीत याची खात्री होती पण असे न होता विरोध झाला पण तो कमी प्रमाणात.
दोन भागात हे मी लिहणार आहे कसे पोहचाल आणि मला आलेले अनुभव
भाग २ (मला आलेले अनुभव)

चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरवात करूयात.

आता प्रतीक्षा संपली होती दिवस उजाडला होता २५ डिसेंबर २०२१ चा. मला ज्यांच्या सोबत मोहीम करायची होती (इंद्रप्रस्थ ट्रेकर) त्यांनी निरोप दिला होता साधारण दुपारी १२:०० पर्यत पायथ्याला पोहोचा. मी गुगल map ची मदत घेतली होती आणि अंदाजे किती वेळ लागेल याचा अंदाज घेतला आणि कळल कि किमान ५:०० तास मला प्रवास करावा लागणार होता. त्यानुसार मी पहाटे ४:०० वाजता उठलो आणि आवरून अंदाजे पहाटे ५:०० वाजता घर सोडल. आदल्या दिवशी गाडीत पेट्रोल भरायचं राहील होत म काय आधी गाडी पंपावर नेली टाकी फुल केली आणि परत प्रवासाला सुरवात केली दिवस थंडीचे होते तरी मी पूर्ण स्वतःला थंडीचे कपडे घालूनच निघालो होतो. पण गारवा हा प्रचंड होता. दुचाकी नेयेचे कारण म्हणजे S.T. चा संप असल्याने मला दुसरा पर्यायच नव्हता आणि त्यातून माझ्या गाडीचा मागचा टायर हा तसा खराब झाला होता. कधी दगा देईल सांगता येत नव्हत.
तरीसुद्धा धाडस करून निघालो होतो. आणि जस पिंपरी चा भक्ती-शक्ती चौक मागे टाकला तसं प्रचंड धुक आणि थंडी ह्यातच माझी अवस्था बेक्कार होणार हे जाणवलं होत आणि मी ठरवल होत जस जमेल तशी हि मोहीम काहीही झालं तरही यशस्वी कराची. हळू हळू अंतर कापत पुढे निघालो होतो मोबाईल मध्ये गुगल map ची मदत घेण हे कायम चालूच होत. लोणावळा-खोपोली-कर्जत -मुरबाड-शहापूर-दहागाव-वासिंद-वांद्रे. असा प्रवास झाला पण अंदाजे मि १०:०० वाजता सकाळी मी शहापूर येथे होतो आणि तरीही धुक हे होतच. मला काही केल्या कळत नव्हत नक्की काय होत आहे कारण मी सकाळी १०:०० वाजता धुक हे पाहिलं नव्हत. ज्या रस्त्याने मी जात होतो काही ठिकाणी साधारण ५-१० किलोमीटर मला कुणीही दिसत नव्हत. अनेकदा रस्ता देखील खराब मिळाला त्यामुळे माझी भीती हि कायमच होती. चाकाला काही होणार तर नाही ना. साधारण १०:०० वाजता मि एके ठिकाणी थांबून घरी फोन करून माझी खुशाली कळवली होती. आता मला अजून १ तास लागणार होता. त्यानुसार मी माझा प्रवास चालू ठेवला होता इथून मी वाटेत २-३ जणांना विचारल होत तर त्यांना काहीच माहिती नाही किंवा मी काहीतरी त्यांना भलतच विचारत आहे अस वाटायचं. अस जेव्हा तिसऱ्यांदा झालं तेव्हा मनाशी निश्चय केला जिथ पर्यंत गुगल नकाशा दाखवत आहे तिथ जायचं आणि बघायचं काहीच नाही मिळाल तर तिथच थांबून म जी फळ सोबत होती ती संपवायची आणि परतीचा प्रवास सुरु करायचा पण वाटेत मी मुंबई नाशिक हायवे क्रॉस केला आणि बहुतेक वासिंद येथे सुरवातीला थांबलो आणि समोरच दर्शन झाले ते "वजीर सुळक्याचे" कि ज्याला पहायची आतुरता होती आता तो मला लांब एका डोंगरावर मजबुतीने घट्ट पाय रोवून सहयाद्री ची शान वाढवत दिमाखात उभा होता.

आता माझ्या आनंदाला आणि उत्साहाला पारावर उरला नव्हता आणि थेट क्षणाचा हि विलंब न करता निघालो. ते थेट नंदिकेश्वर येथे जाऊन थांबलो. वांद्रे ते नंदिकेश्वर हा रस्ता सुधा खूपच कच्चा आणि माझ्या गाडीच्या टायर मुळे मला अजून तो भीतीदायक वाटत होता. मी साधारण ११:२० वाजता तिथे पोहचलो. आधी घरी कळवल मग ट्रेक लीडर अनिलजी वाघ यांना सांगितले. ते म्हंटले तिथे गाडी उभी आहे त्यातून हेल्मेट आणि हार्नेस घेऊन या. पण गाडी पूर्ण लॉक होती गाडीत किंवा आजूबाजूला सुद्धा कुणीच दिसत नव्हते. मी एक दोन वेळा पाहिलं तरी मला कुणीच दिसलं नाही म मी मंदिरात चौकशी केली तिथूनही काही मला नीट उत्तर मिळाले नाही. आता मी निर्णय घेतला की असंच निघायचं पण म्हंटल त्या आधी अनिल दादा यांना कळवू पण त्यांना परत फोन केला तर ते म्हंटले की ड्रायव्हर आहेत गाडीतच मागच्या सीट वर बघा मग मी पुढे आलेलो परत मागे गेलो आणि मला ते मागच्या सीट वर पांघरूण घेऊन झोपलेले दिसले. मग त्यांना उठवलं आणि मला सांगितलेले साहित्य घेऊन मी मंदिराच्या डाव्या बाजूने वजीर सुळक्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली वाटेमध्ये दिशा दर्शकाच्या खुणा ह्या उत्तम केलेल्या असल्याने मला काही वाट शोधावी लागली नाही.
अतिशय दाट झाडी आणि दुपारचे १२ वाजत होते तरीही सूर्य किरणे जमिनीवर पोहचत नव्हती. आशा वातावरणात चढाई ला सुरवात करायची म्हणजे त्रास तर होणारच हे निश्चित. जस जसे मी पुढे जात होतो तसे जंगल अधिक दाट होत होते आणि माझ्या मागे अनेक डास सुद्धा येत होते. अगदी दोन मिनिटे थांबावं म्हंटल तरी लगेच डासांचा मारा चालू होयचा. नेहमी ट्रेक लीडर चला चला म्हणायचे पण त्यांची जागा ही मंडळी भरून काढत होती. साधारण दुपारी १:२० मिनिटांनी मी वजीर सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो.

वर नजर करून पाहिलं की वजीर सुळका थेट आकाशात भिडत असल्याचे भासत होते. त्या दिवशी मी इंद्रप्रस्थ ट्रेकर सोबत मी आणि वाघेश्वर लिमण असे आम्ही दोघेच होतो बाकी त्यांची टीम होती. वाघेश्वर चा आणि माझा परिचय साधारण पोहचल्यानंतर तास भराने झाला असावा. मी पोहचलो तेव्हा इंद्रप्रस्थ चे ट्रेक लीडर वजीराच्या अंतिम टप्प्यात दोर लावत होते. हे मी सर्व पाहत होतो. मला खूप फोटो काढायचे असं ठरवलं होतं पण वजीराचे रुद्र रूप पाहून माझ्या मनातील सर्व विचार एकाबाजूला कसे गेले कळलेच नाही. आणि मला सर्वच गोष्टींचा विसर पडला होता. काही वेळ वजिराचे रुद्र रूप डोळ्यात साठवल्या नंतर मी थोडे धाडस करून माझ्या कडचा मोबाईल बाहेर काढला आणि अगदी काही छायाचित्र मोबाईल मध्ये टिपले. आणि आता मी माझी मानसिक तयारी करून पुन्हा मोबाईल ठेऊन दिला.

आता मी वजीर सुळका सर करण्यासाठी अनिलजी वाघ यांच्याकडून माहिती घेतली आणि चढाई ला सुरवात केली. वजीर सर करण्यासाठी इंद्रप्रस्थ ट्रेकर यांनी अगदी उत्तम नियोजन करून त्याचे चार टप्प्यात विभागणी केली होती त्याला ट्रेकिंग च्या भाषेत station असे म्हंटले जाते. मी पहिल्या टप्प्यात अगदी सहज पोहचलो पण आता इथून खरी चढाई चालू होणार होती.आता दुपारचे ३:१५ वाजत होते. ह्या आधी साधारण ६-७ महिने माझा आसा मोठ्ठा ट्रेक नव्हता झाला त्यामुळे मला कदाचित भीती वाटत होती आणि त्यातून इथे वजीर सुळका सर करायला झुमर क्लैम्बिंग चा वापर करणार होतो हे तंत्रज्ञान वापरून मी पहिल्यांदाच चढाई करणार होतो. ह्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. म्हणजे आपल्या डाव्या हाताने दोर खाली ओढायचा आणि उजव्या हाताने झुमर वरती सारकवायचे. त्याच बरोबर आपले दोन्ही पाय हे कातळाला ९० अंशात टेकवायचे असतात आणि गुरुत्वाकर्षण च्या विरुद्ध दिशेने पूर्ण हे कराव लागत त्यामुळे आपल्या मनगटात भरपूर ताकत असणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना मला जाम वेळ लागला २-३ वेळा अस सुधा वाटल कि आपण इथून मागे फिराव. आणि एकदा मी न राहता पहिल्या टप्प्यात असणारा ट्रेक लीडर मी त्याला सांगितले सुद्धा तर त्यावर त्यांनी मला इतका धिर दिला आणि म्हंटला दादा काही नाही अगदी आरामात जमेल काळजी नका करू.

म मी परत नव्या दमाने सुरवात केली हळू हळू मी वर सरकत सरकत दुसरा टप्पा गाठला होता. इथे मी जरा साधारण १५-२० मिनिटे उभ्या उभ्या माझ्या हाताना आराम दिला आणि आता तिसऱ्या टप्प्याकडे निघायला सुरवात केली. घाबरत घाबरत मी तिसरा टप्पा गाठला होता आता मी साधारण अर्ध्याहून अधिक अंतर पार केल होत. ह्या ठिकाणी मी केवळ पाउलांच्या आधारे उभा होतो. आता इथून शेवटचा टप्पा होता पण तो सुळक्याला थोडा वळसा घालून जाव लागणार होत. हा टप्पा साधारण ५०-६० फुटांचा होता. ५-१० मिनिटे तिसऱ्या टप्प्यात आराम करून मी अंतिम त्प्याकडे चढाई साठी सुरवात केली होती. थोडं अंतर पार केल्यावर आता मी पूर्ण हवेत होतो. माझे पाय कातळाला लागत होते परंतु टिकत नव्हते संध्याकाळ होत होती त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला होता त्यामुळे मला चढाई करणे कठीण जात होत. शिवाय इथून खाली नजर जाताच राकट सहयाद्री चे रूप दिसत हे सगळ पाहून मी मनातून स्वतःला धिर देत वर जात होतो. अंदाजे ४:३० वाजता मी अंतिम टप्पा पार करून आता वजीर सुळका सर केला होता. भयंकर भीती वाटत होती शिवाय आनंद ही होताच अर्थात वजीर सुळक्याच्या वरून दृष्य जितके डोळ्यात साठवता येईल तेवढा प्रयत्न करत होतो कारण मी माझा मोबाईल खाली च ठेवला होता. माझ्या आधी सुळक्यावर वाघेश्वर लिमण हा पोहचला होता. त्यादिवशी इंद्रप्रस्थ ट्रेक ग्रुप मधील अनिलजी वाघ यांचे धाकटे चिरंजीव हा अगदी दोन वर्षांचा बरका, यांचा जन्मदिवस होता. त्यांची अशी ईछा होती कि त्याचा वाढदिवस सुळक्यावर केक कापून करावा. म त्यानुसार सर्वांनी आता एक एक करून चढाई करायला सुरवात केली होती. हे सर्व वरती येईपर्यंत सूर्य अस्ताला जाताना आम्ही अगदी शेवटपर्यत पाहिला. मग अनिल दादा आपल्या लेकाला घेऊन वर आले त्यानंतर २ जण आले आता साधारण ७:३० वाजले होते. मग आम्ही मस्त त्याचा केक कापला दुपार पासून तो बिचारा थकला होता आणि भुकेने तसाच झोपी गेला होता. तो भूके पोटी झोपत नसल्याने त्याच्या आईने तिथे त्याला अंगाई गीत म्हंटल. खरच सांगू मित्रांनो मला असा योग कुणाला मिळाला असेल नसेल माहिती नाही पण मला तो योग मिळाला वजीर सुळक्यावर लिंबोणी च्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई...

हे गीत एकून मला माझ्या बाल पणीची आठवण झाली. मला आठवतय माझी मामेबहिण माझ्यासाठी हे गाण म्हणायची.

केक कापून आम्ही आता उतरायची सुरवात केली होती ह्याला rappling असे म्हणतात.

आम्ही सर्व खाली उतरून थोड थोड डब्यात जे जे होत ते सर्वांनी वाटून खाल्ल. आता अंदाजे ९:३० - १०:०० वाजत होते त्या नंतर आम्ही परत नंदिकेश्वर येथे आमच्या गाड्या लावल्या होत्या त्या ठिकाणी जायला निघालो अंधार प्रचंड होता त्यामुळे आम्हाला पूर्ण खाली उतरायला वेळ जरा जास्त लागला. पूर्ण खाली उतरून आता आम्हाला ११:३० रात्रीचे वाजले होते. माझी घराकडची ओढ आता वाढली होती कारण मी सुळक्यावर असताना वाघेश्वर च्या फोन वरून भावाला सांगितले होते कि साधारण रात्री २ पर्यंत घरी पोहचेल पण आता असे होणार नव्हते. कारण पुण्यात पोहचायला मला नंदिकेश्वर इथून अंदाजे ५:०० तास लागणार होते.म्हणजे दुसऱ्या दिवसाची पहाटच.

मी आणि वाघेश्वर आम्ही इंद्रप्रस्थ ट्रेक ग्रुप चा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने निघालो. आम्ही माझ्या मोबाईल वर map लावला होता आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती पण सकाळी मी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो हे काही अंतर पार केल्या नंतर कळल. हा रस्ता साधारण ५० किलोमीटर खडबडीत आणि ५-१० किलोमीटर मला सकाळी कुणीही दिसले नव्हते. मी हा प्रकार सर्व वाघेश्वर ला सांगितला आणि एकमताने हायवे नेच जायचा निर्णय घेतला. म गाड्या फिरवून आम्ही पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो आणि थोड लांब पडल तरी चालेल पण मुख्य रस्त्यानेच जायचं अस ठरल त्यानुसार आता सुरवात झाली. माझ्या मोबाईल वर map लावल्याने पुढे मी आणि मागे वाघेश्वर असे आम्ही हळू हळू ठाण्याच्या दिशेने निघायला सुरवात केली. ठाण्यात आम्ही रात्रीचे २:०० वाजता पोहचलो होतो. म तिथे गाड्या कडेला घेतल्या आणि चहा चा आस्वाद घेतला. दिवसभर जागरण झाल्याने दोघांना प्रचंड झोप येत होती वाघेश्वर चे मित्र लालबाग येथे असल्याने त्याने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा सुद्धा पुण्याला येणार होता पण झोप येत असल्याने तो लालबाग येथे जातो म्हंटला. मला पुण्यात येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म त्याच चहा वाल्याला मी रस्ता विचारला आणि पुण्याच्या दिशेने प्रवास चालू झाला तो फक्त माझ्या एकट्याचा. सर्वांनाच माहिती आहे कि कितीही रात्र झालं तरीही मुंबई काही झोपत नाही आणि माणस कायम वेळेला धावून येतात. याचाच प्रत्यय मला अनेक ठिकाणी त्याच दिवशी आला तो म्हणजे मी पुण्याचा असल्याने मला मुंबई चे रस्ते समजण जरा कठीणच झाले होते. म मी वाटेत अधून मधून थेट रात्री गस्तीला असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याना च रस्ता विचारला आणि त्यांनी व्यवस्तीत सांगितला सुद्धा. पण सर्वांनी मला express highway चा रस्ता सांगितला त्यामुळे मी त्या रस्त्याला कधी लागलो माझ मलाच कळेना. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता. मी हळू हळू डाव्या हाताने गाडी चालवत होतो थंडी प्रचंड होती आता पहाट होत असल्याने परत धुक पडायला सुरवात झाली होती. मी आधल्या दिवशी सुधा लवकर उठल्याने आता मला हळू हळू डुलक्या येत होत्या त्यामुळे मला असा अंदाज आला कि गाडी बाजूला घेऊन २-३ मिनिटे थांबायचो आणि पुन्हा सुरवात करायचो पण नंतर नंतर अगदी पापण्या बंद केल्या तरी झोपच लागायची. आता मी असा हळू हळू खोपोली पर्यंत आलो होतो तिथून गाडी express highway मधून बाहेर काढून मला आता जुन्या मुंबई पुणे रस्त्याने पुण्याला येयचे होते पण जसा मी खोपोली मध्ये शिरलो तसे धुके प्रचंड दाट झाले होते पुढचे अगदी काहीच दिसत नव्हते म्हंटले तरीहि चालेलं. बर रस्ता विचारावा तर इतकी पाहट आणि थंडी असल्याने रस्त्याला सुधा कुणीच नव्हते. व्यवस्थित वाट लागली होती माझी.

इतक्यात मला खोपोली मधेच एक दुचाकी आडवी गेली आणि मी धाडसाने गाडी वरूनच त्यांना विचारले कि "दादा लोणावळ्यात कस जायचं??" ते चटकन थांबले आणि मागे बसलेले काका खाली उतरून थेट माझ्या पर्यंत चालत आले. मला म्हंटले मला तुम्ही रेल्वे सटेश पर्यंत सोडाल का?? मी लगेच उत्तरलो आणि म्हंटल हो सोडतो बसा पण मला रस्ता सांगा. ते हि हो म्हंटले आणि गाडीवर बसले आता आमच्या दोघांचा प्रवास चालू झाला होता ते मला माझी माहिती विचारू लागले मी हि त्यांना उत्तर देत होतो. कुठून आलो कुठ चाललो वगैरे वगैरे... मात्र अगदी ३-४ मिनिटानी आमचे बोलणे थांबले आणि शांतता झाली. इतक्यातच मला डुलकी लागली आणि त्यामुळे गाडी थोडी वाय्ब्ल झाली हे त्या काकांना कळले देखील. त्यांनी पुढे एक हॉटेल आहे असे सांगितले तिथे गाडी बाजूला घेयला लाऊन मला न विचारताच त्यांनी थेट दोन चहा सांगितले आणि एक पाण्याची बाटली देखील. मला त्या काकांनी तोंड धुवायचा आग्रह केला त्यानुसार मी तोंड धुतले आणि चहा घेता घेता आमचा अधिक परिचय झाला. वाव्हाळे त्या काकांचे नाव, माझा नंबर त्यांनी घेतला व मी देखील त्यांचा नंबर घेतला. ते कोर्टात कामाला होते. त्यांना पुढे कल्याण ला जायचे होते. त्यांनी मला लोणावळ्याचा अगदी व्यवस्तीत रस्ता सांगितला आणि ते त्यांच्या वाटेने निघून गेले. ह्या व्हावळे काकांची मला इथे भरपूर मदत झाली. शिवाय मला त्यांनी हे देखील सांगितले कि बाळ घरी पोहचलास कि नक्की कळव. मी सुधा त्यांना हो म्हंटल आणि पुढे निघालो होतो.

घाटात एक वळण होत त्या बद्दल मला काकांनी सांगितले होते कि नक्की कुठे जायचे आणि मला झोप जास्त येत असल्याने त्यांनी सांगितलेले मी आता विसरलो होतो. त्यामुळे पार दोन वेळा मी चुकून पुन्हा express highway ला जाऊन परत जुन्या वाटेला येऊन थांबलो होतो. इतक्यात एक पोलीस गाडी गस्त घालत माझ्या पर्यत आली आणि मला विचारले कि काय झाले मी त्यांना सरळ सांगून टाकले रस्ता विसरलो आहे पुण्याला जायचा त्यांनी हि मला मदत केली आणि म्हंटले कि चला माझ्या मागे म मी गाडीवर बसलो आणि निघालो हळू हळू. मग काही अंतर पार केल्यावर मला रस्ता आता उमगला होता. मी त्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आणि पुढे निघालो ते सुधा त्यांच्या वाटेने निघून गेले.

पहाटेचे ६:०० वाजत होते अजूनही उजाडत नव्हत, मी लोणावळा टोल नाका येथे थांबून मस्त MAGGI चा आस्वाद घेतला. चहा घेला आणि पुन्हा गाडी वर स्वार होऊन पुण्याकडे निघालो. धुकं अजूनही होतच शिवाय मला झोप देखील येतच होती. मी रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी हळू हळू चालवतच होतो (झोपत झोपत). शिवाय काही ठिकाणी थांबत सुद्धा होतो. पण मला झोप काही आता आवरत नव्हती. तरीही मी ठरवल होत की काहीही झालं तही पण थांबायचे ते थेट घरी जाऊनच.

आता माझी झोप पार शिगेला पोहचली होती आणि काही अंतर गाडी हि झोपेतच चालवली ह्यातच घरून फोन देखील येऊन गेला होता हे देखील मला कळले नव्हते. नाशिक फाटा येते सिग्नल ला थांबलो असताना परत घरून फोन आला आणि म मी तो उचलला. तेव्हा घरच्यांच्या जीवात जीव आला कारण मी वेळ दिली होती दोन ची आणि आता दुसरा दिवस उजाडून सकाळचे पावणे आठ वाजले तरीही मी आलेलो नव्हतो तेव्हा ह्यांनी फोना फोनी चालू केली. सुळक्यावर असताना वाघेश्वर च्या फोन वरून फोन केल्यामुळे माझ्या भावाने त्याच्या कडे हि चौकशी केली त्याने घरी धीर दिला आणि सांगितले येईल तो फक्त थोडा वेळ लागेल. माझ घरी फोन वर बोलण झालं आणि त्यांना बरे वाटले तेव्हा. मी ८:३० वाजता घरी पोहचलो होतो. म भावाला फोन करून सांगितले त्याने वाघेश्वर ला सांगितले घरी पोहचल्याचे तसेच मी व्हावळे काकांना सुद्धा सांगितले.

ह्या वजीर सुळका मोहिमेत मला ट्रेक चा तर अतिशय सुंदर अनुभव तर आलेच शिवाय अगदी लहान गावातील महाराष्ट्र देखील पाहता आला शिवाय प्रवास हा काय आणि कसा असतो ह्याचा सुद्धा अनुभव आला. तसेच झोप किती महत्वाची असते हे देखील कळले.

ह्या साठी मला मदत केली असे सर्व माझे मित्र -मैत्रीण,घरचे, वाव्हाळे काका, वाघेश्वर लिमण आणि इंद्रप्रस्थ ट्रेकर ह्यांचा मी कायम ऋणी राहीन.

Thursday, January 6, 2022

पुण्यातून वजीर सुळका येथे कसे पोहचाल (How to reach Vajir pinnacle from Pune)

"वजीर" हे नाव ऐकताच बऱ्याच जणांचे हृदयाचे ठोके चुकतात. म तो वजीर बुद्धिबळाच्या पटावरचा असो की खरोखरी च्या युद्धा मधला. कारण दोन्ही कडे तितक्याच निर्भीड पणे तो उभा ठाकलेला असतो म्हणजे शत्रूशी दोन हात करायला. पण हा वजीर ना ही युद्धातील आहे किंवा बुद्धिबळातील हा वजीर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत मालेतील, ठाणे जिल्ह्यातील डोंगर रंगांमधील माहुली किल्ल्यापासून एकटा झालेला म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून "वजीर सुळका" होय. अनेक जणांना ह्याचा फोटो पाहूनच त्यांना घाम फुटतो पण आम्ही सह्य भटके, दुर्गवेडे आम्हाला वजीर कायम साद घालत असतो. आणि न कळतच कधी पाऊलं तिकडे वळतात कळत देखील नाही.

ज्याची उंची २०० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २८०० फूट आहे. २०० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळपास सहाशे फूट आणि पाण्याची प्रचंड कमतरता आहे त्यामुळे या सुळक्यावर ट्रेकिंग करायचं ठरवलं आणि इकडचा पाय तिकडे पडला तर थेट दरीच्या जबड्यातच विश्रांती. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची २०० फुटांची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. प्रत्येक प्रस्तारारोहकाच स्वप्न म्हणजे वजीर सुळक्याचा माथा. या सुळक्याविषयी दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आहे ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे.
साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करायची.

आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून मला कळले की २५ डिसेंम्बर २०२१ रोजी इंद्रप्रस्थ ट्रेकर ह्याला गवसणी घालणार आहेत आणि मी क्षणाचाही विलंब न करता सांगितले की ह्या मोहिमे साठी मी सुद्धा इच्छुक आहे. हे मला साधारण १ ते दीड महिना आधी कळाले होते म तसे मी आमच्या ऑफिस मध्ये सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवले होते. पण घरी मी १० दिवस आधी सांगितले कारण वजीर सुळक्याचे फोटो पाहून ते मला सोडणार नाहीत याची खात्री होती पण असे न होता विरोध झाला पण तो कमी प्रमाणात.
दोन भागात हे मी लिहणार आहे कसे पोहचाल आणि मला आलेले अनुभव
भाग १ (कसे पोहचाल)

आता प्रतीक्षा संपली होती अखेर तो दिवस आला होता. मला मिळालेल्या निरोपा नुसार मी २५ तारखेला दुपारी १२ पर्यंत वजीर सुळक्याच्या पायथ्याला असलेल्या वांद्रे येथे असलेल्या नंदिकेश्वर येथे पोहचणे अपेक्षित होते. मग मी गुगल मॅप वर आधी शोधूनच ठेवले होते तेव्हा कळले होते की साधारण ५ तास लागतात.
ठाणे येथे पुण्यातून जायला तसे मार्ग अनेक पण मी जो निवडला होता तो नेहमीचा
१) पुणे-लोणावळा-खोपोली-कर्जत-मुरबाड-शहापूर-दहागाव- वासिंद-वांद्रे-नंदिकेश्वर
आणि दुसरा सुद्धा आहे
२) पुणे-चाकण-मंचर-नारायणगाव-जुन्नर-पारगाव-माळशेज घाट- मोरोशी- माणगाव - शहापूर -दहागाव -वांद्रे -नंदिकेश्वर

वरील पैकी मला सोयीचा वाटला तो पहिला मार्ग आणि मी त्या वाटेवरून नंदिकेश्वर इथपर्यंत जाऊन पोहचलो. येथील काही फोटो खाली दिले आहेत.
वरील फोटो हा नंदिकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या अतिशय जुन्या दगडी वस्तू चा आहे. ह्यावर सर्प देवतेचे चित्र अतिशय उत्तम पद्धतीने कोरले आहे. ह्याचा उपयोग कदाचित त्याकाळी जनावरांना पाणी ठेवण्यासाठी करण्यात येत असावा.

येथून सुळक्या पर्यंत जाणारी वाट ही मंदिराकडे तोंड करून उभं राहिलं तर आपल्या डाव्याहाताने थेट अगदी न चुकता सुळक्या पर्यंत जाते. अधे मध्ये दिशा दिशादर्शकाच्या खुणा सुद्धा पाहायला मिळतात आणि दगड रचून ठेवलेले सुद्धा काही ठिकाणी आपण पाहू शकता.
उत्तम मळलेळी पाऊलवाट आहे. ह्या वाटेमध्ये काही टप्पा हा थोडा दाट झाडीचा आहे आणि कारवी चे रान ही अखेरच्या टप्प्यात आहे. ह्यामुळे येथे आपल्याला डासांचा त्रास जाणवतो.

वजीर सुळका सर करण्यासाठी आपल्याला प्रस्थरोहण दोरी च्या साह्यानेच करावे लागते. येथे आरोहण करताना आम्ही झुमर क्लाईंबिंग चा वापर करून माथ्यावर पोहचलो. ह्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. डाव्या हाताने दोर खाली खेचायचा आणि त्याच बरोबर उजव्या हाताने झुमर वरती सरकवायचे. आपले दोन्ही पाय हे कातळाला ९० अंशात टेकवायचे आणि शरीर फक्त हातांच्या जोरावर वरती म्हणजे गुरुत्वाकर्षणा च्या विरुद्ध बाजूला ढकलायचे. माझ्यासाठी झुमर क्लैम्बिंग चा अनुभव पहिलाच होता. ह्यामध्ये आपल्या शारीरिक क्षमतेचा पूर्णपणे कस लागतो. साधारण प्रत्येक ट्रेक ग्रुप आपल्या सोईने ह्या सुल्क्याचे काही टप्पे ठरवत असतो. इंद्रप्रस्थ ट्रेकर यांनी या मोहिमे मध्ये सुद्धा असेच चार टप्पे केले होते. ह्याला इंग्रजी मध्ये station असे देखील म्हणतात. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना मला प्रचंड वेळे लागला. माझ्या पेक्षा वयाने लहान असलेला इंद्रप्रस्थ ट्रेकर चे सर्वच लीडर मला वेळोवेळी प्रोत्साहन देत होते. आणि त्यांच्याच मुळे माझी हि मोहीम फत्ते झाली. त्यांचा मी मनापासून आभारी आहे जे स्वप्नात पाहिलं होते ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे.
ठराविक अंतर पार केल्यानंतर तहान खूप लागते परंतु इथे आपल्या प्रत्येकाला पाण्याची बाटली शांत उभं राहून पाणी पिता येईलच याची खात्री नाही तेवढा अनुभव गाठीशी हवा. अश्या ठिकाणी हायड्रेशन बॅग असेल तर उत्तम. आपण जरका अनुभवी पर्वतारोही असू तर आपण साधारण ४०-६० मिनिटात हा सुळका सर करू शकता. पण त्याच बरोबरीचे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यांच्या सोबत हा सुळका आरोहण मोहीम करत असाल तो ग्रुप आपल्याला माहीत असावा किंवा त्यांनी आधी केलेल्या मोहिमा कुठे कुठे केल्या आहेत त्यांचे ट्रेक लीडर हे किती अनुभवी आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपण ह्या साठी खालील पैकी कोणत्याही ट्रेक ग्रुप सोबत ही मोहीम अगदी निश्चित यशस्वी करू शकता. (हे या माझ्या माहितीचे आहेत.)
१) इंद्रप्रस्थ ट्रेकर
२) शिलेदार

ह्या मोहिमेत मला अनेक अनुभव आले अर्थातच ते प्रत्येक मोहिमेत कायम वेगवेगळे असतात पण हा सुधा अनुभव आपल्याला सांगायचा मोह काही टाळता येत नाहीये. भाग २ मध्ये लिहित आहे पुढच्या पोस्ट मध्ये.

वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्य...