पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?


नमस्कार मित्रानो बऱ्याच दिवसांनी आणि माझ्या यादीतील बहुप्रतीक्षित दुर्गांपैकी एक म्हणजे सिंदोळा दुर्ग. ह्या दुर्गाचा इतिहास फारसा उजेडात न आल्याने ह्याची माहिती बऱ्याच जणांना माहितीच नाही. उत्तर कोकणातील बंदरांना जुन्नर (जिर्णनगर) या घाटमाथ्यावरील बाजारपेठेला जोडणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले. जुन्नरचे रक्षण करणारा शिवनेरी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हडसर, चावंड, जिवधन, नारायणगड,ह्नुमंतगड-निमगिरी आणि सिंदोळा या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. जूना माळशेज घाट चढून गेल्यावर त्याच्या माथ्यावर असणार्‍या सिंदोळा किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती.

ह्या दुर्गावर अखेर जाण्याचा योग आला तो म्हणजे ५ जुलै २०२४ ला. खर तर बाल मैत्रिण तिच्या सोबत पर्वतदुर्ग म्हणजेच हडसर दुर्गाची सफर करणार होतो पण आयत्यावेळी तिला काही तरी काम आल आणि त्यामुळे तिचे रद्द झाले. म काय मधला अधला वार असल्याने मला जरा सोबत कुणी येईल का नाही याची शंका च होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला मागचा वैराट दुर्गाचा अनुभव हा अगदी जीवावर बेतता बेतता राहिला. त्यामुळे कुणी तरी सोबत आल्या शिवाय काय मी जाणार नव्हतो. म काय जे नेहमी चे मेंबर भटकंती साठी कायम तयार असतात आज ते हि व्यस्त होते. म मी ज्या संघाच्या शाखेत होतो त्या शाखेतील नचिकेत पडळकर आणि रोहन चुडेकर ह्यांना विचारलं कारण ह्यांच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि ते घरीच असतील याची खात्री होती. हि मंडळी आता बरीच मोठ्ठी झाली होती शाखेत होते तेव्हा ६-७ वी ला असतील. पण आज ह्यंचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले होते, त्यामुळे आता आम्ही बऱ्याच वर्षांनी एकत्र ट्रेक करणार होतो. रोहन चुडेकर ला मी जेव्हा msg केला तेव्हा तो चुकून त्याच्या आई ला गेला आणि त्यामुळे आमच बोलण होयला रात्रीचे ११ वाजले. तरीही पठ्या तयार झाला आणि दुसर्या दिवशी नियोजित वेळेपेक्षा उशिराने का होईना हजर झाला.

जस नचिकेत पडळकर हो म्हंटला तेव्हाच त्याला सांगितले कि अरे बरेच दिवसात ब्लॉग नाही लिहिला तर त्यासाठी आपण लालपरी ने प्रवास करायचा का? नचिकेत म्हणाला चालेल कि त्यात काय आणि म आकाश मोहिते ह्याला विचारले आम्हाला सकाळी बस ने जायचं आहे तर तू सोडणार का? तो हि तयार झाला. पण रात्री हे रोहन महाराज अचानक तयार झाले आणि म अजून एक गाडी लागणार आपल्याला बस स्थानका पर्यंत सोडायला हे लक्षात येताच हक्काने केतन बांदल ला सांगितले तो पण लवकर उठावे लागणार म्हणून कसाबसा तयार झाला. आता काय अशी रात्र काढायची होती कि नवीन दुर्ग मोहीम, बहुप्रतीक्षित दुर्ग आणि जुने सवंगडी परत भेटणार होते अश्या मध्ये झोप लागेल तरी कशी. म काय कशी बशी रात्र काढली आणि सकाळी वेळेत उठलो आवरले आणि लालपरी चा प्रवास म्हणून कॅश काढायला ATM मध्ये गेलो जाता जाता आधी नचिकेत म रोहन नंतर आकाश आणि केतन ह्यांना फोन लावायला सुरवात केली सगळ्यांनी फोन उचलले रोहन सोडून मला वाटल आवरत असेल पण नंतर परत शंका आली अरे हा अजून झोपला तर नसेल म काय पुन्हा फोन लावला तेव्हा रोहन दादा उठले तोवर नचिकेत अर्ध्या वाटेत आला होता आणि आकाश आणि केतन यांना पण फोन करून बोलावून घेतले. केतन, आकाश आणि नचिकेत हि मंडळी आली वेळेत आता वाट पाहत होतो ती फक्त रोहन ची. रोहन येणार हे नचिकेत ला माहितीच नव्हते तो म्हंटला चला कि शिक्षक आले कि सगळे म्हंटल अरे नाही थांब रोहन पण येणार. म पुन्हा रोहन ला फोन लावला आणि काकांनी उचलला आधी मला वाटल कि काका नाही सोडत म्हणतायत कि काय पण त्यांनी सांगितल कि रोहन आवरत आहे, जीवात जीव आला. पुढच्या १०-१५ मिनिटात रोहन दादांचे आगमन झाले तिथे हि चुकामूक हि झालीच.

आता आम्ही वाकडेवाडी च्या दिशेने प्रवास चालू केला होता. पुढच्या १० मिनिटात आम्ही तिथे पोहचलो आणि म चौकशी ला सुरवात झाली कि खुबीफाट्याला कोणती गाडी कुठुन जाते? दोन तीन वेळा वेग वेगळी चौकशी केल्यावर कळलं की आधी नारायणगाव ला जावं लागेल आणि मग तिथून पारगाव ला जाणारी गाडी पकडून ती गाडी किल्ल्याच्या पायथ्या ला सोडते.

पुढच्या ५-१० मिनिटात आम्हाला नारायणगाव ला जाणारी बस मिळाली आणि आता आमचा सिंदोळा च्या दिशेने पुढचा प्रवास चालू झाला होता. एका सीट वर रोहन आणि नचिकेत बसले आणि दुसऱ्या बाजूला मी बसलो. म काय अनेक जुने किस्से गप्पा सुरू झाल्या. नंतर थोड्यावेळाने दोघेही झोपी गेले आणि म त्यांना मी नारायणगाव आल्यावर उठवल. हे दोघे कसे तयार झाले हे माझ मलाच माहिती होत त्यामुळे आधी दोघांना विचारलं की थेट पुढची गाडी पकडायची की आधी न्याहरी करायची? दोघेही उत्तरले नाही आधी न्याहरी करू न म पुढचं बघू. ठीक आहे म्हणत आता आम्ही तिघेही नारायणगाव बस स्थानकावर उतरलो आणि बस स्थानकावरील कॅन्टीन ची सुविधा कुठे आहे ते पाहु लागलो. लगेचच आम्हाला ते सापडल आणि तिघेही तिथे गेलो. तिघांनी मेन्यू पाहिला आणि काय ऑर्डर देयची हे निश्चित केलं. पण मला कधी दुर्गावर जाईल अशी उत्सुकता लागली होती, म उगाच बाथरूम ला जायचं म्हणुन ऊठुन बाहेर आलो आणि पुढील बस ची चौकशी केली. असे कळले की पुढची बस १०:०० वाजता आहे. आम्ही गाडीतून उतरलो तेव्हा साधारण ९:०० वाजत होते. म काय निवांत न्याहरी केली चहा पिला.

बाहेर स्थानकावर आता पुढच्या प्रवासची चौकशी करुयात असे म्हणतानाच सहज लक्ष वर गेले आणि पाहतो तर काय! बस स्थानकावर एका बाजूला सर्व पर्यटनस्थळे आणि त्या जागी कोणती बस जाते हे सगळ निट लिहल होत. हे पाहून मला एक वेगळच समाधान मिळालं. त्याचा pic इथे खाली जोडला आहे.


ती सर्व माहिती घेऊन आता आम्ही चौकशी केंद्राकडे निघालो. आम्हाला आता दोन गोष्टी विचारायच्या होत्या त्या म्हणजे करंजळे किंवा पारगावला जाणारीगाडी कोणती? नेहमप्रमाणे तेथून योग्य ती माहिती नाहीच मिळाली पण बाजूने एक ड्रायवर काका चालले होते त्यांना सहज विचारलं कारंजळे गावाला कोणती बस जाते तर आधी त्यांना कळलं च नाही की आम्ही नक्की आम्हाला कुठे जायचं आहे ते. म त्यांनी पुन्हा थोड पुढे जाऊन थांबले आणि म्हंटले अरे सिंदोळा वर जायचं आहे होय. मग त्यांनी सांगितलं की कारंजळे नाही रे "करंजळे" नाव आहे असे सांगुन रीत सर त्यांनी आमची हार्ड कोअर पुणेरी लोकांची लायकी काढली. पण त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले, थेट गाडी कुठे आणि किती वाजता लागेल. आता आम्ही गाडीची वाट पाहत होतो. कोणतीही गाडी आली तरी आम्ही अगदी आशेने पाहायचो. पण गाडी काकांनी सांगितलेल्या वेळेतच आणि सांगितलेल्या ठिकाणीच आली. मग काय तिघांनी आप आपली जागा घेतली आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. पण आम्हाला नक्की कुठे उतरायचे हे माहित नव्हते त्यामुळे आम्ही संम्रभात होतो पण आमच्या पुढे बसलेले एक रवी साबळे दादा होते त्यांनी पारगाव चे तिकीट काढले आणि आम्ही म त्यांनाच विचारले कि कोणते तिकीट काढू आम्हाला सिंदोळा ला जायचे आहे. ते म्हंटले थांबा ओळखीचे एक सर आहेत ते प्रचंड भ्रमंती करतात त्यांना माहिती आहे, आणि त्यांचा नंबर देतो आणि त्यांनाच विचारा. म काय त्यांनी सांगितल्या प्रमाणे लगेच नंदकुमार साबळे सर यांना फोन लावला आणि विचारल कि नक्की कुठे उतरू आम्हाला गडावर जायचं आहे. त्यांनी सांगितल निट फोन वर कि पारगाव मधून जवळ पडेल, करंजळे गावातून फिरून रस्ता जातो तुम्हाला उगाच वेळ लागेल, बस मधून उतरल्यावर माळशेज अग्रो बघा कुठे आहे आणि त्या दिशेने चालत जावा त्याच्याच समोर एक घर आहे तिथूनच रस्ता जातो थोड बांधावरून जावा म व्यवस्थित पायवाट मिळेल. त्यांना धन्यवाद बोललो त्यांच्या सांगण्या नुसार पारगाव चे तिकीट काढले. आमचा लाल परी चा प्रवास चालूच होता. त्या सरांनी हे देखील सांगितले कि तिकडे पाउस चालू आहे. हि माहिती नचिकेत आणि रोहन ला दिली. आता तिकीट काढून तर झाले पण पुन्हा एक काका आले आणि ते सर्वांना एक किंवा अर्धा पेढा देत होते. सुरवातीला तर मला अगदी काहीच नाही कळले पण नंतर लक्षात आले कि काकांचा हा व्यवसाय आहे. आज मला product मार्केटिंग कसे करायला हवे ह्याची हि पण पद्धत कळली. पेढे देत देत काका आमच्या पर्यंत आले आम्हाला पण पेढा दिला ३-४ सेकंद थांबले आणि पुढे गेले.

सरांनी सांगितल्या प्रमाणे पाउस बराच होता. मस्त सह्याद्री चे सुखद दृश नजरेत साठवून आम्ही जात होतो. साधारण एक तासाभराने आमचा बस थांबा आला आणि आम्ही उतरलो. उतरल्या उतरल्या मस्त रस्त्यावरूनच सिंदोळा दुर्गाचे विलोभनीय दृश्य होत होते. तरी पण उतरल्यावर पुन्हा माहिती घेतली कसे आणि कुठून जायचे आणि मग दुर्गाकडे कूच केली. प्रचंड उत्साह मनात होता तिघांच्या. झापा झप पाउल पुढे टाकत निघालो. अगदी १५-२० मिनिट चालल्यानंतर आम्हाला माळशेज अग्रो दिसल त्याच्या समोर एक घर होत म त्या घरात हाक मारली आणि गडावर जाण्याचा रस्ता पुन्हा नक्की करून म पुढे निघालो. पहिली ३-४ मिनिट बांधावरून हळू हळू वाट काढत पुढे निघालो. मागे वळून जरा गावाकडे पाहिलं अगदी १-२ मिनिट थांबलो.


पुन्हा गप्पा मारत आम्ही आता पाउल वाटेवरून हळू हळू पुढे जात होतो. पण अगदी १५-२० मिनिटाच्या चाली नंतर आम्ही एक पठारा पाशी येऊन पोहचलो पण येथून आधी जशी मळलेली वाट होती ती आता आम्हाला सापडत नव्हती. आम्ही वाट शोधायचा प्रयत्न केला नचिकेत एका बाजूला गेला रोहन एक बाजूला गेला पण ते परत आल्या नंतर दोघांचे मत वेग वेगळे होत होते. म थोडी चर्चा केली आणि कुठे जायचं ह्याचा निर्णय करतच होतो त्यात एक स्थानिक मावशी दिसल्या. म आम्ही त्यांना विचारल कि मावशी गडावर जायचं आहे कस जायचं तर त्यांनी सांगितल कि "हे काय जायचं अस वाट काढत काढत" अजून एकदा तोच प्रश्न परत विचारला पण त्यांचे उत्तर काही बदलले नाही. त्यांना धन्यवाद म्हणलो आणि ह्या दोघांना मी विचारात घेतल म्हंटल त्यांना रस्ता माहिती नाही आपल्याला पण वाट नवीन आहे. आपण पुन्हा गावात जाऊ कुणाला तरी सोबत घेऊ आणि पुन्हा नव्याने सुरवात करू. हो नाही म्हणत आम्ही पुन्हा गावाकडे निघालो आणि जिथून सुरवात केली होती तिथे न जाता जिथे जास्त घर दिसत होती त्या ठिकाणी गेलो. तिथे गावात आम्हाला एका घरासमोर भोईर दादा दिसला त्याला आम्ही आमची अडचण सांगितली आणि म्हंटल कि गावातून कुणी येईल का गडावर त्याने पण सांगितले आज मधला आधलावार आहे पोर शाळेला गेली आहेत तरी बघतो कुणी आहे का ते. असे म्हणून त्याने एकानं फोन लावला पण त्याने वाट दाखवायची काहीच्या काही पैश्यांची मागणी केली आम्ही ते कमी करायचा प्रयत्न केला पण ज्या दादाने ज्याला फोन लावला होता तो बहुदा चंद्रावर असावा आम्हाला त्याने सांगितले कि अरे हा चंद्रावर दिसत आहे मी लगेच उत्तरलो दादा आम्हाला गडावर जायचे आहे, चंद्रावर नाही. सगळे हसले. दादा म्हंटला मी इथून वाट सांगतो तसेच जावा अजिबात चुकणार नाही काही लागलच तर फोन करा बिन्दास्त मला. म काय दादा ने आम्हाला वाट सांगितली आणि आम्ही तिघांनी ती दोन वेळा समजावून घेतली. आता पुन्हा आम्ही गडाच्या दिशेने पाउल टाकायला सुरवात केली होती. ह्या सगळ्या प्रकरणात आमचा एक तास गेला होता. आता दुपारचे १ वाजत होते. ह्या वाटेवर जाताना नेच नावच मला झाड दिसल त्याचे tatto आपल्या शरीरावर नीट प्रेस केले तर छान दिसते असे मी इंस्टाग्राम वर पाहिले होते आणि त्याचा प्रयत्न पण केला ण तो यशस्वी देखील झाला. पण ह्या नादात मी जरा जास्तच जोरात नचिकेत चा हातावर ते पान दाबले. भाऊ पार कळवले ना. पण त्याचे चित्र पाहून भाई सुखावलाना.

दादाने सांगितल्या प्रमाणे आम्हाला वाट व्यवस्थित मिळाली असा अंदाज आमचा पुन्हा २० मिनिटातच चुकला. कारण पुन्हा मळलेली वाट आता विरळ होऊन नाहीशी झाली होती. ह्या सगळ्या मध्ये पाउस येत जात होता. वाट शोधायचा प्रयत्न पुन्हा आम्ही करायला लागलो ह्यातच पावसाची एक सर खूप जोरात आली. आम्ही तिघेही जागेवरच थांबलो आणि तिघांची पण चर्चा झाली कि अरे आज आमवस्या आहे आणि आपण सारखे सारखे वाट चुकत आहेत असा उल्लेख झाला पण तिघांनी पण ह्यावर फारशी चर्चा ण करता वाट शोधू असा ग्रह पक्का केला, मन घट्ट करत काहीही करून किल्ला सर करायचा हे तर निश्चित होते. म पुन्हा नचिकेत आणि रोहन म्हंटले कि शिक्षक आम्ही जरा पुढे जाऊन पाहून येतो. मी आपला पुन्हा होतो त्या जागेवर थांबलो आणि त्यांची वाट पाहू लागलो. पण नचिकेत आणि रोहन ला वाट सापडली असे त्यांनी मला सांगत एक दिशेला बोलावले. मी हि तिकडे गेलो आणि त्या वाटेवरून चढाई सुरु केली अगदी थोड अंतर जाताच आम्हाला झाडाला बरोबर वाट असल्याची खुण दिसली. हि वाट आता गर्द झाडीतून वर जात होती. हा टप्पा पार केल्यावर आता पुन्हा आम्ही एका पठारावर पोहोचलो आणि परत प्रश्न उभा राहणार की आता कोणती वाट निवडायची इतक्यात आम्हला एक वयस्कर काका काकू दिसले आम्ही म हळू हळु त्यांच्या दिशेने जाऊ लागलो. बारीक पाऊस चालुच होता. हे दोघेही गुरं चरवण्यासाठी वर आले होते. आम्ही त्यांच्या कडे गेलो आणि त्यांना पण गडावर जाण्याची वाट विचारली. ह्यांनी देखील आम्हाला अगदी निट माहिती सांगितली. हे दोघे खाली गावात आम्हाला जो भोईर दादा भेटला होता त्याचे आई बाबा होते असं आम्हाला गप्पा मारताना त्यांनीच सांगितलं. आता त्यांना आम्ही धन्यवाद म्हणुन पुढे निघालो. पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की बाळांनो आम्ही इथे ४ पर्यंत आहोत. त्याच्या आत परत या. याच कारण ह्या पावसाळी दिवसात अंधार लवकर पडतो शिवाय वातावरण कधी एकदम क्षणात बदलत हे काहीच सांगता येत नाही. आम्ही आणि ह्या कुटुंबाची भेट साधारण २ वाजता झाली होती. आता काहीही करून आम्हाला वेळेत गडावर पोहचून गड पूर्ण पाहून खाली उतरायचं होत. हे तिघांच्या पण आता लक्षात आल होत. काकांनी सांगितल्या नुसार आम्हाला समोरचा डोंगर चढून त्याच्या माथ्यावरून दुसरा डोंगर न चढता त्याला वळसा घालुन आम्हाला पुढच्या खिंडीतून गडाकडे जाण्यास सांगितले होते. त्या नुसार आम्ही आता पुढे जाण्यास सुरवात केली होती. पण पुन्हा थोड पुढे जाताच आमची माळलेली वाट ही नाहीशी झाली होती. आणि अधून मधुन बरोबर वाटेच्या खुणा म्हणून झाडांना रीबिनी बांधल्या होत्या त्या पण आता दिसेनाष्या झाल्या होत्या. आम्ही एका खिंडी पाशी अडकलो होतो. काकांनी आम्हाला खालूनच सांगितले होते की ह्याच खिंडीतून तुम्ही वर गेलात की सरळ वाट मिळेल. पण हा दुर्ग इतका अल्प परिचित असल्याने इकडे आम्हाला कायम वाट शोधावी लागत होती. इथे पण आम्ही हो नाही करत खिंड चढून जाण्याचा निर्णय घेतला. ह्या खिंडीत प्रचंड झाडी असल्यामुळे रोहन आणि नचिकेत आड वाटांवर जास्त न आल्यामुळे जरा घाबरत होते. पण इथेच जर नेहमीची गँग सोबत अस्ती तर झपा झप वाट काढून पुढे गेले असते. पण हे नवखे असल्याने मी पण काही आग्रह न करता त्यांना हवे तसे हळू हळू वर चढु दिले. इथुन वर गेल्यावर आम्हाला पुन्हा काही वाटा दिसल्या त्यामुळे आम्ही पुन्हा बुचकळ्यात पडलो की अरे आता नक्की कुठे जायचं. पण काकांनी सांगितलं होत की ह्या डोंगराच्या माथ्यावर जायचं आहे. खिंड पार केली तरी आम्ही पूर्ण डोंगर माथ्यावर पोहचलो नव्हतो. पण इथे मात्र गंमत झाली. माथ्यावर जाण्याच्या नादात मी पटा पट वर चढून गेलो, हे दोघे राहिले ना खाली. मी वर आल्यावर मला व्यवस्थित आता गड माथ्यावर जाणारी वाट दिसत होती. मी ह्यांना सांगितले ओरडुन पण हे कुठेच दिसेना. त्यांना हाक मारली तर ते उत्तरले शिक्षक कुठे आहात आम्ही कसे येऊ? मला फक्त यांचा आवाज येत होता पण हे काही केल्या दिसेना अगदी २-३ सेकंद मी जरा घाबरलो होतो पण आवाज येत असल्याने इतकं काळजी चे कारण नव्हते. अगदी लगेच दोघेही दिसले पण एकदम खडी चढाई असल्याने रोहन जरा घाबरला होता हे मला वरून स्पष्ट दिसत होते. वरून मी सांगत होतो अरे इकडून ये असा ये इकडे वाट आहे. साधारण ते ही अंदाज घेत हळू हळू वर आले. मळलेली वाट पाहून आता आमच्या तिघांच्या जीवात जीव आला होता. चढाई सुरू केली असल्या पासून ते अगदी गड उतार होई पर्यंत नचिकेत इतके मस्त मस्त स्पॉट आम्हाला दाखवत होता ना की त्या ठिकाणी पाहिलं की शरीराचा थकवा अगदी क्षणात नाहीसा होत होता. फक्त स्पॉट च नाही तर जिथे जिथे खेकडे दादा दिसतील तिथे हे दादा खेकडा पकडायचा कायम प्रयत्न करायचे म तो कितीही मोठ्ठा असेना. पण त्यातला जरा छोटा त्याने पकडून माझ्या हातात दिला म काय त्याची मज्जा जरा मी पण घेतली. लगेच दोघांनी मला भीती दाखवायचा प्रयत्न पण केला शिक्षक काकूंना सांगेल हा खेकडा खाल्ला म्हणून.


पण ह्याही ठिकाणी नचिकेत ने आम्हाला पिंपळगाव जोगा धरणाचे बॅक वॉटर चे मनमोहक दृश्य दाखवले. ह्याचे मस्त pic काढले आणि वेळ न दवडता आम्ही आता दुर्गाच्या दिशेने कूच केली होती. अगदी पुढे जाताच आम्हाला दुर्गाचा माथा अगदी आगडी स्पष्ट दिसला आणि ह्याच माथ्यावर भगवा ध्वज मानाने फडकत होता. म काय ह्या ठिकाणी जरा २-४ pic काढले आणि पुन्हा पुढे निघालो. आता वाट ही अगदी निमुळती झाली होती. डावीकडे पूर्ण दरी आणि उजव्या हाताला किल्ल्याचा भाग. जरा जरी पाऊल चुकले तरी आमचा कडे लोट होणार होता त्यामुळे पाऊले अगदी हळू हळू टाकत आम्ही पुढे जात होतो. अगदी थोडे पुढे गेल्यावर आम्ही एका खिंडीमध्ये पोहचलो या ठिकाणी एक गुहा असल्याचे जाणवत होते आणि इथूनच पुढे एक चिमणी कलाइंब चा टप्पा होता परंतु खुप पावसाने हा कातळ टप्पा खुप निसरडा झाला होता. आवश्यक साधन असली तर आपण इथुन दुर्ग माथा गाठु शकतो. जी लांबुन गुहा वाटत होती त्यात पाणी साठलेले दिसले आणि एक स्टील चा पेला पण ह्या ठिकाणी दिसला. कदाचित स्थानिक इथे उन्हाळयात पाणी पित असावे. म इथे थोड फोटो शूट केलं.

आता घड्याळात ०२:३० वाजत होते आम्हाला लवकरात लवकर गड माथा गाठून, सर्व किल्ला पाहून परत उजेडात निघायचं होत. म वेळ न दवडता आम्ही शेवटच्या खिंडी कडे निघालो. वाट खुप अरुंद होती, वारा हा खुप वेगाने वहात होता आणि पावसाच्या हलक्या सरी पण चालू होत्या. इथेच पूर्वीच्या काळी कातळात खोदलेल्या पायऱ्या देखील आहेत.

ह्या पार केल्या की खिंड आता आम्हाला दिसत होती एकदम खडी चढाई होती त्यामुळे थोड वर गेलं की दम लागत होता. पण आता फक्त इतकाच टप्पा राहिला होता त्यामुळे न थांबता पुढे जायचा निर्णय घेतला आणि ०२:४० वाजता आम्ही गडाच्या प्रवेश द्वारात प्रवेश केला. आता आम्ही जरा मनातुन सुखावलो होतो कारण २ वेळा रस्ता चुकला होता त्यात आमवस्या होती. दुर्गावर प्रवेश करताच गणरायाच्या आणि मारुतीराया च्या दर्शनाने मन प्रसन्न झाले.
ते दर्शन घेऊन दुर्गाचे प्रवेशद्वार कसे असेल याचा अंदाज बांधला कारण सध्या ते संपूर्ण भग्न अवस्थेत आहे. पुढे निघालो दुर्गाचा माथा गाठायला. दुर्गाचा माथा पटकन गाठण्यासाठी आम्ही नेहमीच्या वाटेने न जाता माजलेल्या गवतातून निर्णय घेतला कारण इतकंच की आमच्या कडे वेळ कमी होता. रिस्क होती पण ते म्हणतात ना रिस्क है तो इश्क है. आजूबाजूचा परिसर न्याहाळत आम्ही बरोबर ३ वाजता गड माथा गाठला. या ठिकाणी एक भगवा ध्वज होता आणि अगदी लहान जागा होती की आम्ही तिघे जण कसे बसे बसू शकू. मग काय मस्त छान बसलो आधी पोटोबा केला. बिस्कीट आणि फळ या वर ताव मारला.
माथ्यावरून कोणते कोणते दुर्ग दिसतात हे पाहायचा प्रयत्न केला पण धुक असल्याचे फक्त निमगिरी आणि हनुमंत गड दिसले. आता गडावर काय काय आहे हे पाहायचे होते. पण आधी या दोघांना सहज शब्द टाकला की अरे आपण तिघेही स्वयंसेवक आहोत, ध्वज ही आहे तर म प्रार्थना म्हणुन पुढे जाऊया. दोघांनी क्षणात होकार अर्थी मान हलवली न आम्ही रचनेत उभे राहिलो अज्ञा दिल्या आणि प्रार्थना म्हणली. समोरच असलेल्या पाय वाटेने उरलेला किल्ला पाहायचे ठरले आणि हळू हळू किल्ला पाहायला सुरवात केली. दुर्गावर एकूण ७ पाण्याची टाकी आहेत. त्यातील ४ टाक्यांचा समूह हा एकत्र आहे बाकी तीन पण जवळच आहेत. पैकी एक पूर्ण पावसात सुध्दा रिकाम होत.
पाहून आश्चर्य वाटल ह्या ठिकाणी आमच्या रोहन आणि नचिकेत भाऊंनी जरा फोटो सेशन केलं आणि पुढे निघालो परंतु किल्ला अगदी थोडका असल्याने गडावर इतकंच पाहण्या सारखं होत. पूर्वीच्या काळी ह्या दुर्गाचा उपयोग माळशेज घाट वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी झाला असावा असे इतिहास कार सांगतात. गड माथा आटोपशीर असल्याने, अगदी अर्ध्या तासात आमची दुर्ग फेरी आणि पोट पूजा व्यवस्थित झाली. आता आम्ही गड उतार होयला सुरवात केली. गड उतरताना आम्हाला पाऊल अगदी जपुन टाकावी लागत होती कारण जरा तरी पाऊल चुकल की थेट दरीत गेलो असतो. हे दोघेही जरा तसे नवखे च होते त्यामुळे यांना नीट सांगितलं की भीती वाटतं असेल तर बिंधास्त खाली बसुन उतारा. हे वाक्य आमच्या रोहन भाऊंनी लगेच ऐकल आणि हळु हळु गड उतार होऊ लागले. इथे आता आम्हाला जरा एक चांगला spot मिळाला या ठिकाणी आम्ही पुन्हा फोटो शुट केलं. मी नवीनच चालू केलेला बुटांचा व्यवसाय म्हटल इथे जरा ह्याच पण branding करूयात आणि त्याचे देखील pic काढले. कुणाला ट्रेक साठी उत्तम बुट हेवे असल्यास नक्की सांगा. ८०८७७००३१६.

आता आमच्या कडे दोन वाटा होत्या १. आलो त्या वाटेने जायचे किंवा २. समोर दिसत असलेल्या मळलेल्या वाटेने करजंळे गावात जाणे. २ री वाट अतिशय सोप्पी पण फिरून जाणारी होती. आणि पाहिली वाट हे गर्द झाडीतून जरा जोखमीची वाट होती. डोंगराच्या नाकाडावर थांबुन दोन्ही वाटांचा आढावा घेतला आणि चर्चा केली तर रोहन शेठ म्हंटले की आपण अर्धी वाट ही २ ने उतरू आणि सपाटी ला लागलो की पुन्हा आपल्या पहिल्या वाटेकडे जाऊ. हे तर अजूनच वाढीव वाटत होत कारण पुन्हा वाट नाही सापडली तर अवघड होणार होत. हो नाही करत उतरायला सुरवात केली. ह्या रस्त्याने आता आम्ही प्रथमच उतरत होतो. काही ठिकाणी दगडांवर arrow ने खुणा देखील केल्या होत्या.
रस्ता वळणा वळणा चा आणि झाडी चा होता. पुढच्या १० मिनिटातच आम्ही हा टप्पा पार करून आता सपाटी ला आलो होतो. पण पारगाव ला म्हणजे जिथून आलो ती वाट काही सहज दिसत नव्हती पण एक काका आम्हाला गुर राखताना दिसले. आम्ही तिघेही त्यांच्या दिशेने चालू लागलो काका ही आमच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. आम्ही त्यांना सांगितल की पारगावात जायचं कस जायचं? त्यांनी हाताने खुणवल आणि म्हंटले की इकडून असं तितकं तिरक गेलात की पारगाव. पण आम्हाला काही मळलेली वाट काही दिसेना. ते ही त्यांना सांगितलं पण ते म्हंटले काळजी नका करू थेट गावात पोहचाल तुम्ही जावा इकडून. मग काय निघालो हळू हळू. पुढच्या १० मिनिटात आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जिथे वाट चुकलो होतो त्याच ठिकाणी आलो होतो. मग काय आमचा जोर वाढला होता आता कारण ह्या वाटेने आता आम्ही तिसऱ्यांदा जाणार होतो. साधारण पुढच्या ५ मिनिटात आम्हाला पुन्हा एक आजोबा भेटले ते पण गुरांना चरवण्यास घेऊन आले होते.
मजा मस्ती करत आम्ही ज्यांना चुकल्या नंतर रस्ता विचारला होता त्यांच्या घरा पर्यंत सुखरूप आलो होतो. त्यांचे आभार मानले आणि बस मध्ये असताना आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केले ते करंजळे गावातील सर यांना पण सांगितलं आमची दुर्ग भ्रमंती मस्त झाली आणि आता परतीच्या प्रवासा साठी निघालो आहे ह्या वर ते उत्तरले मी सुध्दा आता बस थांब्यावर च आहे जमल्यास सोबत चहा घेऊ. पण काही तो योग आला नाही. आम्ही बस थांब्याच्या दिशेने निघालो आणि आता संध्याकाळ चे ०५:०० वाजत होते. ह्या दोघांना म्हटल अरे चला पटकन ५ ची लाल परी मिळेल म्हणुन पटा पट चालायला लागलो अगदी शेवटी साधारण २००-३०० मीटर पळालो पण आमच्या डोळ्या समोरून लाल परी आम्हाला न घेताच निघुन गेली.

म काय पुढच्या गाडी ची वाट पाहत बसलो. इतक्यातच हे दोघेही म्हंटले की गाडी येईल आणि आली दिसेलच आपल्याला तोवर आपण समोरून वडापाव तरी खाऊ. म काय तिघांनी पुन्हा रस्ता ओलांडला आणि काकांना ३ वडापाव ची ऑर्डर दिली आणि वाट पाहू लागलो गाडी + वडापाव ची. या शर्यतीत अखेर वडापाव जिंकला.

नंतर थोड्या वेळाने गाडी आली त्यात चढलो. आम्हाला थेट पुणे किंवा जुन्नर ह्या पैकी गाडी चालणार होती पण कंडक्टर काका म्हंटले की तुम्हाला गाडी आळेफाट्या ला सोडेल तिथून तुम्हला पुण्याची गाडी मिळेल. ठीक आहे म्हंटल.

आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. ह्या प्रवासात आम्हाला पुन्हा ते पेढ्याचा व्यवसाय करणारे काका भेटले आणि आमच्या तिघांच्या चेहऱ्यावर आनंद आला कारण ते आम्हाला पुन्हा एकदा पेढ्याची चव देणार होते. म त्या पेढ्याचा आस्वाद घेत आम्ही आळेफाट्या पर्यंत पोहचलो. या ठिकाणी मी या दोघांना विचारले की जेवण करायचं आहे इथे की नको. दोघेही नको बोलले आधी पुण्याची गाडी पाहू म ठरवू पण गाडी ची चौकशी केली असता कळलं की आम्ही जिथे थांबलो होतो तिथेच गाडी येईल. अगदी पुढच्या ५-१० मिनिटात गाडी आली. नशिब आमचे इतके चांगले होते की आम्हाला थेट पुण्याची गाडी मिळाली होती. अगदी शेवटच्या सिटांवर आम्हाला जागा मिळाली. म काय तिघेही एकच सिटवर बसलो. जरा गप्पा झाल्यावर केतन आणि आकाश ज्यांनी आम्हाला स्टँड वर सोडले होते त्यांना कळवल की आता आम्ही निघत आहोत साधारण ०९:३० पर्यंत येऊ पुण्यात पण हे ड्राइवर काका वाढवी वाटत होते वेळेच्या आत च त्यांनी गाडी पुण्यात आणली होती. ही मंडळी गाड्या घेऊन येई पर्यंत आम्ही कुठे खायचं हे नक्की केलं आणि ह्यांना आल्या आल्या सांगितले की चौपाटी ला जायचं आहे. पण ही गोष्ट इतकी सरळ होईल असे नव्हते ह्यात आमचे आकाश भाऊ शनिवार वाडा चौपाटी ला आले आणि आम्ही वृधेश्र्वर चौपाटी ला न आम्ही इथे पुन्हा आकाश ची वाट पाहिली. दोन मिनिटातच आकाश शेठ आले. म काय मस्त टेबल बुक केला आणि ऑर्डर दिली पेट पूजा करून आमच्या अविस्मरणीय ट्रेक ची सांगता केली.


अंदाजे जायचा खर्च एकाचा :
वाकडेवाडी ते नारायणगाव (S.T) ₹११५/-
नारायणगाव ते पारगाव ₹९८/-
एकूण खर्च ₹२१३/-

परतीचा एकाचा खर्च :
पारगाव ते आळेफाटा ₹६०/-
आळेफाटा ते वाकडेवाडी ₹१३०/-
एकूण खर्च ₹१९०/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
सिंदोळा दुर्ग हा अवघड नाही परंतु काही ठिकाणी काळजी घेणे हे महत्वाचे आहे.
दुर्गावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत पहिली वाट करंजळे गावातून वाट जाते हि सोप्पी आणि मळलेली वाट आहे पण हि खूप फिरून जाते.
दुसरी वाट हि पारगावातून जाते. हि वाट जास्त मळलेली नसल्याने शिवाय गर्द झाडीतून जाते त्यामुळे आपल्याया वाटाड्या नेणे गरजेचे आहे.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
गडांवर केवळ पावसाळ्यात पिण्याचे पाणी असते पण ते पिण्याच्या योग्यतेचे नाही.
गडावर जेवणाची सोय हि आपल्यालाच करावी लागते.
वाकडेवाडी वरुन नारायणगाव दिशेने सारख्या बसेस आहेत पण नारायणगाव किंवा आळेफाटा येथून मात्र पूर्ण पुढच्या गाड्यांची चौकशी करून घ्यावी आणि मगच पुढच्या प्रवासाला निघावे.

Comments

  1. मस्त, खूप छान आणि विस्तृत माहिती 👌

    ReplyDelete
  2. Wa saurabh ....mast mahiti dilies.... Keep it up

    ReplyDelete
  3. अविस्मरणीय अनुभव!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

माहिती होत ती बोलणार नाही काही