वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात.

माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते.

मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे
१) कळकराई सुळका
२) वानरलिंगी सुळका
३) वजीर सुळका
४) बाण सुळका
५) नवरा- नवरी सुळका

साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करायची.

आणि सोशल मीडिया च्या माध्यमातून मला कळले की २५ डिसेंम्बर २०२१ रोजी इंद्रप्रस्थ ट्रेकर ह्याला गवसणी घालणार आहेत आणि मी क्षणाचाही विलंब न करता सांगितले की ह्या मोहिमे साठी मी सुद्धा इच्छुक आहे. हे मला साधारण १ ते दीड महिना आधी कळाले होते म तसे मी आमच्या ऑफिस मध्ये सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवले होते. पण घरी मी १० दिवस आधी सांगितले कारण वजीर सुळक्याचे फोटो पाहून ते मला सोडणार नाहीत याची खात्री होती पण असे न होता विरोध झाला पण तो कमी प्रमाणात.
दोन भागात हे मी लिहणार आहे कसे पोहचाल आणि मला आलेले अनुभव
भाग २ (मला आलेले अनुभव)

चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरवात करूयात.

आता प्रतीक्षा संपली होती दिवस उजाडला होता २५ डिसेंबर २०२१ चा. मला ज्यांच्या सोबत मोहीम करायची होती (इंद्रप्रस्थ ट्रेकर) त्यांनी निरोप दिला होता साधारण दुपारी १२:०० पर्यत पायथ्याला पोहोचा. मी गुगल map ची मदत घेतली होती आणि अंदाजे किती वेळ लागेल याचा अंदाज घेतला आणि कळल कि किमान ५:०० तास मला प्रवास करावा लागणार होता. त्यानुसार मी पहाटे ४:०० वाजता उठलो आणि आवरून अंदाजे पहाटे ५:०० वाजता घर सोडल. आदल्या दिवशी गाडीत पेट्रोल भरायचं राहील होत म काय आधी गाडी पंपावर नेली टाकी फुल केली आणि परत प्रवासाला सुरवात केली दिवस थंडीचे होते तरी मी पूर्ण स्वतःला थंडीचे कपडे घालूनच निघालो होतो. पण गारवा हा प्रचंड होता. दुचाकी नेयेचे कारण म्हणजे S.T. चा संप असल्याने मला दुसरा पर्यायच नव्हता आणि त्यातून माझ्या गाडीचा मागचा टायर हा तसा खराब झाला होता. कधी दगा देईल सांगता येत नव्हत.
तरीसुद्धा धाडस करून निघालो होतो. आणि जस पिंपरी चा भक्ती-शक्ती चौक मागे टाकला तसं प्रचंड धुक आणि थंडी ह्यातच माझी अवस्था बेक्कार होणार हे जाणवलं होत आणि मी ठरवल होत जस जमेल तशी हि मोहीम काहीही झालं तरही यशस्वी कराची. हळू हळू अंतर कापत पुढे निघालो होतो मोबाईल मध्ये गुगल map ची मदत घेण हे कायम चालूच होत. लोणावळा-खोपोली-कर्जत -मुरबाड-शहापूर-दहागाव-वासिंद-वांद्रे. असा प्रवास झाला पण अंदाजे मि १०:०० वाजता सकाळी मी शहापूर येथे होतो आणि तरीही धुक हे होतच. मला काही केल्या कळत नव्हत नक्की काय होत आहे कारण मी सकाळी १०:०० वाजता धुक हे पाहिलं नव्हत. ज्या रस्त्याने मी जात होतो काही ठिकाणी साधारण ५-१० किलोमीटर मला कुणीही दिसत नव्हत. अनेकदा रस्ता देखील खराब मिळाला त्यामुळे माझी भीती हि कायमच होती. चाकाला काही होणार तर नाही ना. साधारण १०:०० वाजता मि एके ठिकाणी थांबून घरी फोन करून माझी खुशाली कळवली होती. आता मला अजून १ तास लागणार होता. त्यानुसार मी माझा प्रवास चालू ठेवला होता इथून मी वाटेत २-३ जणांना विचारल होत तर त्यांना काहीच माहिती नाही किंवा मी काहीतरी त्यांना भलतच विचारत आहे अस वाटायचं. अस जेव्हा तिसऱ्यांदा झालं तेव्हा मनाशी निश्चय केला जिथ पर्यंत गुगल नकाशा दाखवत आहे तिथ जायचं आणि बघायचं काहीच नाही मिळाल तर तिथच थांबून म जी फळ सोबत होती ती संपवायची आणि परतीचा प्रवास सुरु करायचा पण वाटेत मी मुंबई नाशिक हायवे क्रॉस केला आणि बहुतेक वासिंद येथे सुरवातीला थांबलो आणि समोरच दर्शन झाले ते "वजीर सुळक्याचे" कि ज्याला पहायची आतुरता होती आता तो मला लांब एका डोंगरावर मजबुतीने घट्ट पाय रोवून सहयाद्री ची शान वाढवत दिमाखात उभा होता.

आता माझ्या आनंदाला आणि उत्साहाला पारावर उरला नव्हता आणि थेट क्षणाचा हि विलंब न करता निघालो. ते थेट नंदिकेश्वर येथे जाऊन थांबलो. वांद्रे ते नंदिकेश्वर हा रस्ता सुधा खूपच कच्चा आणि माझ्या गाडीच्या टायर मुळे मला अजून तो भीतीदायक वाटत होता. मी साधारण ११:२० वाजता तिथे पोहचलो. आधी घरी कळवल मग ट्रेक लीडर अनिलजी वाघ यांना सांगितले. ते म्हंटले तिथे गाडी उभी आहे त्यातून हेल्मेट आणि हार्नेस घेऊन या. पण गाडी पूर्ण लॉक होती गाडीत किंवा आजूबाजूला सुद्धा कुणीच दिसत नव्हते. मी एक दोन वेळा पाहिलं तरी मला कुणीच दिसलं नाही म मी मंदिरात चौकशी केली तिथूनही काही मला नीट उत्तर मिळाले नाही. आता मी निर्णय घेतला की असंच निघायचं पण म्हंटल त्या आधी अनिल दादा यांना कळवू पण त्यांना परत फोन केला तर ते म्हंटले की ड्रायव्हर आहेत गाडीतच मागच्या सीट वर बघा मग मी पुढे आलेलो परत मागे गेलो आणि मला ते मागच्या सीट वर पांघरूण घेऊन झोपलेले दिसले. मग त्यांना उठवलं आणि मला सांगितलेले साहित्य घेऊन मी मंदिराच्या डाव्या बाजूने वजीर सुळक्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली वाटेमध्ये दिशा दर्शकाच्या खुणा ह्या उत्तम केलेल्या असल्याने मला काही वाट शोधावी लागली नाही.
अतिशय दाट झाडी आणि दुपारचे १२ वाजत होते तरीही सूर्य किरणे जमिनीवर पोहचत नव्हती. आशा वातावरणात चढाई ला सुरवात करायची म्हणजे त्रास तर होणारच हे निश्चित. जस जसे मी पुढे जात होतो तसे जंगल अधिक दाट होत होते आणि माझ्या मागे अनेक डास सुद्धा येत होते. अगदी दोन मिनिटे थांबावं म्हंटल तरी लगेच डासांचा मारा चालू होयचा. नेहमी ट्रेक लीडर चला चला म्हणायचे पण त्यांची जागा ही मंडळी भरून काढत होती. साधारण दुपारी १:२० मिनिटांनी मी वजीर सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो.

वर नजर करून पाहिलं की वजीर सुळका थेट आकाशात भिडत असल्याचे भासत होते. त्या दिवशी मी इंद्रप्रस्थ ट्रेकर सोबत मी आणि वाघेश्वर लिमण असे आम्ही दोघेच होतो बाकी त्यांची टीम होती. वाघेश्वर चा आणि माझा परिचय साधारण पोहचल्यानंतर तास भराने झाला असावा. मी पोहचलो तेव्हा इंद्रप्रस्थ चे ट्रेक लीडर वजीराच्या अंतिम टप्प्यात दोर लावत होते. हे मी सर्व पाहत होतो. मला खूप फोटो काढायचे असं ठरवलं होतं पण वजीराचे रुद्र रूप पाहून माझ्या मनातील सर्व विचार एकाबाजूला कसे गेले कळलेच नाही. आणि मला सर्वच गोष्टींचा विसर पडला होता. काही वेळ वजिराचे रुद्र रूप डोळ्यात साठवल्या नंतर मी थोडे धाडस करून माझ्या कडचा मोबाईल बाहेर काढला आणि अगदी काही छायाचित्र मोबाईल मध्ये टिपले. आणि आता मी माझी मानसिक तयारी करून पुन्हा मोबाईल ठेऊन दिला.

आता मी वजीर सुळका सर करण्यासाठी अनिलजी वाघ यांच्याकडून माहिती घेतली आणि चढाई ला सुरवात केली. वजीर सर करण्यासाठी इंद्रप्रस्थ ट्रेकर यांनी अगदी उत्तम नियोजन करून त्याचे चार टप्प्यात विभागणी केली होती त्याला ट्रेकिंग च्या भाषेत station असे म्हंटले जाते. मी पहिल्या टप्प्यात अगदी सहज पोहचलो पण आता इथून खरी चढाई चालू होणार होती.आता दुपारचे ३:१५ वाजत होते. ह्या आधी साधारण ६-७ महिने माझा आसा मोठ्ठा ट्रेक नव्हता झाला त्यामुळे मला कदाचित भीती वाटत होती आणि त्यातून इथे वजीर सुळका सर करायला झुमर क्लैम्बिंग चा वापर करणार होतो हे तंत्रज्ञान वापरून मी पहिल्यांदाच चढाई करणार होतो. ह्यासाठी आपल्या दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. म्हणजे आपल्या डाव्या हाताने दोर खाली ओढायचा आणि उजव्या हाताने झुमर वरती सारकवायचे. त्याच बरोबर आपले दोन्ही पाय हे कातळाला ९० अंशात टेकवायचे असतात आणि गुरुत्वाकर्षण च्या विरुद्ध दिशेने पूर्ण हे कराव लागत त्यामुळे आपल्या मनगटात भरपूर ताकत असणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाताना मला जाम वेळ लागला २-३ वेळा अस सुधा वाटल कि आपण इथून मागे फिराव. आणि एकदा मी न राहता पहिल्या टप्प्यात असणारा ट्रेक लीडर मी त्याला सांगितले सुद्धा तर त्यावर त्यांनी मला इतका धिर दिला आणि म्हंटला दादा काही नाही अगदी आरामात जमेल काळजी नका करू.

म मी परत नव्या दमाने सुरवात केली हळू हळू मी वर सरकत सरकत दुसरा टप्पा गाठला होता. इथे मी जरा साधारण १५-२० मिनिटे उभ्या उभ्या माझ्या हाताना आराम दिला आणि आता तिसऱ्या टप्प्याकडे निघायला सुरवात केली. घाबरत घाबरत मी तिसरा टप्पा गाठला होता आता मी साधारण अर्ध्याहून अधिक अंतर पार केल होत. ह्या ठिकाणी मी केवळ पाउलांच्या आधारे उभा होतो. आता इथून शेवटचा टप्पा होता पण तो सुळक्याला थोडा वळसा घालून जाव लागणार होत. हा टप्पा साधारण ५०-६० फुटांचा होता. ५-१० मिनिटे तिसऱ्या टप्प्यात आराम करून मी अंतिम त्प्याकडे चढाई साठी सुरवात केली होती. थोडं अंतर पार केल्यावर आता मी पूर्ण हवेत होतो. माझे पाय कातळाला लागत होते परंतु टिकत नव्हते संध्याकाळ होत होती त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला होता त्यामुळे मला चढाई करणे कठीण जात होत. शिवाय इथून खाली नजर जाताच राकट सहयाद्री चे रूप दिसत हे सगळ पाहून मी मनातून स्वतःला धिर देत वर जात होतो. अंदाजे ४:३० वाजता मी अंतिम टप्पा पार करून आता वजीर सुळका सर केला होता. भयंकर भीती वाटत होती शिवाय आनंद ही होताच अर्थात वजीर सुळक्याच्या वरून दृष्य जितके डोळ्यात साठवता येईल तेवढा प्रयत्न करत होतो कारण मी माझा मोबाईल खाली च ठेवला होता. माझ्या आधी सुळक्यावर वाघेश्वर लिमण हा पोहचला होता. त्यादिवशी इंद्रप्रस्थ ट्रेक ग्रुप मधील अनिलजी वाघ यांचे धाकटे चिरंजीव हा अगदी दोन वर्षांचा बरका, यांचा जन्मदिवस होता. त्यांची अशी ईछा होती कि त्याचा वाढदिवस सुळक्यावर केक कापून करावा. म त्यानुसार सर्वांनी आता एक एक करून चढाई करायला सुरवात केली होती. हे सर्व वरती येईपर्यंत सूर्य अस्ताला जाताना आम्ही अगदी शेवटपर्यत पाहिला. मग अनिल दादा आपल्या लेकाला घेऊन वर आले त्यानंतर २ जण आले आता साधारण ७:३० वाजले होते. मग आम्ही मस्त त्याचा केक कापला दुपार पासून तो बिचारा थकला होता आणि भुकेने तसाच झोपी गेला होता. तो भूके पोटी झोपत नसल्याने त्याच्या आईने तिथे त्याला अंगाई गीत म्हंटल. खरच सांगू मित्रांनो मला असा योग कुणाला मिळाला असेल नसेल माहिती नाही पण मला तो योग मिळाला वजीर सुळक्यावर लिंबोणी च्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई...

हे गीत एकून मला माझ्या बाल पणीची आठवण झाली. मला आठवतय माझी मामेबहिण माझ्यासाठी हे गाण म्हणायची.

केक कापून आम्ही आता उतरायची सुरवात केली होती ह्याला rappling असे म्हणतात.

आम्ही सर्व खाली उतरून थोड थोड डब्यात जे जे होत ते सर्वांनी वाटून खाल्ल. आता अंदाजे ९:३० - १०:०० वाजत होते त्या नंतर आम्ही परत नंदिकेश्वर येथे आमच्या गाड्या लावल्या होत्या त्या ठिकाणी जायला निघालो अंधार प्रचंड होता त्यामुळे आम्हाला पूर्ण खाली उतरायला वेळ जरा जास्त लागला. पूर्ण खाली उतरून आता आम्हाला ११:३० रात्रीचे वाजले होते. माझी घराकडची ओढ आता वाढली होती कारण मी सुळक्यावर असताना वाघेश्वर च्या फोन वरून भावाला सांगितले होते कि साधारण रात्री २ पर्यंत घरी पोहचेल पण आता असे होणार नव्हते. कारण पुण्यात पोहचायला मला नंदिकेश्वर इथून अंदाजे ५:०० तास लागणार होते.म्हणजे दुसऱ्या दिवसाची पहाटच.

मी आणि वाघेश्वर आम्ही इंद्रप्रस्थ ट्रेक ग्रुप चा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने निघालो. आम्ही माझ्या मोबाईल वर map लावला होता आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती पण सकाळी मी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो हे काही अंतर पार केल्या नंतर कळल. हा रस्ता साधारण ५० किलोमीटर खडबडीत आणि ५-१० किलोमीटर मला सकाळी कुणीही दिसले नव्हते. मी हा प्रकार सर्व वाघेश्वर ला सांगितला आणि एकमताने हायवे नेच जायचा निर्णय घेतला. म गाड्या फिरवून आम्ही पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो आणि थोड लांब पडल तरी चालेल पण मुख्य रस्त्यानेच जायचं अस ठरल त्यानुसार आता सुरवात झाली. माझ्या मोबाईल वर map लावल्याने पुढे मी आणि मागे वाघेश्वर असे आम्ही हळू हळू ठाण्याच्या दिशेने निघायला सुरवात केली. ठाण्यात आम्ही रात्रीचे २:०० वाजता पोहचलो होतो. म तिथे गाड्या कडेला घेतल्या आणि चहा चा आस्वाद घेतला. दिवसभर जागरण झाल्याने दोघांना प्रचंड झोप येत होती वाघेश्वर चे मित्र लालबाग येथे असल्याने त्याने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा सुद्धा पुण्याला येणार होता पण झोप येत असल्याने तो लालबाग येथे जातो म्हंटला. मला पुण्यात येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म त्याच चहा वाल्याला मी रस्ता विचारला आणि पुण्याच्या दिशेने प्रवास चालू झाला तो फक्त माझ्या एकट्याचा. सर्वांनाच माहिती आहे कि कितीही रात्र झालं तरीही मुंबई काही झोपत नाही आणि माणस कायम वेळेला धावून येतात. याचाच प्रत्यय मला अनेक ठिकाणी त्याच दिवशी आला तो म्हणजे मी पुण्याचा असल्याने मला मुंबई चे रस्ते समजण जरा कठीणच झाले होते. म मी वाटेत अधून मधून थेट रात्री गस्तीला असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याना च रस्ता विचारला आणि त्यांनी व्यवस्तीत सांगितला सुद्धा. पण सर्वांनी मला express highway चा रस्ता सांगितला त्यामुळे मी त्या रस्त्याला कधी लागलो माझ मलाच कळेना. पण जेव्हा लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता. मी हळू हळू डाव्या हाताने गाडी चालवत होतो थंडी प्रचंड होती आता पहाट होत असल्याने परत धुक पडायला सुरवात झाली होती. मी आधल्या दिवशी सुधा लवकर उठल्याने आता मला हळू हळू डुलक्या येत होत्या त्यामुळे मला असा अंदाज आला कि गाडी बाजूला घेऊन २-३ मिनिटे थांबायचो आणि पुन्हा सुरवात करायचो पण नंतर नंतर अगदी पापण्या बंद केल्या तरी झोपच लागायची. आता मी असा हळू हळू खोपोली पर्यंत आलो होतो तिथून गाडी express highway मधून बाहेर काढून मला आता जुन्या मुंबई पुणे रस्त्याने पुण्याला येयचे होते पण जसा मी खोपोली मध्ये शिरलो तसे धुके प्रचंड दाट झाले होते पुढचे अगदी काहीच दिसत नव्हते म्हंटले तरीहि चालेलं. बर रस्ता विचारावा तर इतकी पाहट आणि थंडी असल्याने रस्त्याला सुधा कुणीच नव्हते. व्यवस्थित वाट लागली होती माझी.

इतक्यात मला खोपोली मधेच एक दुचाकी आडवी गेली आणि मी धाडसाने गाडी वरूनच त्यांना विचारले कि "दादा लोणावळ्यात कस जायचं??" ते चटकन थांबले आणि मागे बसलेले काका खाली उतरून थेट माझ्या पर्यंत चालत आले. मला म्हंटले मला तुम्ही रेल्वे सटेश पर्यंत सोडाल का?? मी लगेच उत्तरलो आणि म्हंटल हो सोडतो बसा पण मला रस्ता सांगा. ते हि हो म्हंटले आणि गाडीवर बसले आता आमच्या दोघांचा प्रवास चालू झाला होता ते मला माझी माहिती विचारू लागले मी हि त्यांना उत्तर देत होतो. कुठून आलो कुठ चाललो वगैरे वगैरे... मात्र अगदी ३-४ मिनिटानी आमचे बोलणे थांबले आणि शांतता झाली. इतक्यातच मला डुलकी लागली आणि त्यामुळे गाडी थोडी वाय्ब्ल झाली हे त्या काकांना कळले देखील. त्यांनी पुढे एक हॉटेल आहे असे सांगितले तिथे गाडी बाजूला घेयला लाऊन मला न विचारताच त्यांनी थेट दोन चहा सांगितले आणि एक पाण्याची बाटली देखील. मला त्या काकांनी तोंड धुवायचा आग्रह केला त्यानुसार मी तोंड धुतले आणि चहा घेता घेता आमचा अधिक परिचय झाला. वाव्हाळे त्या काकांचे नाव, माझा नंबर त्यांनी घेतला व मी देखील त्यांचा नंबर घेतला. ते कोर्टात कामाला होते. त्यांना पुढे कल्याण ला जायचे होते. त्यांनी मला लोणावळ्याचा अगदी व्यवस्तीत रस्ता सांगितला आणि ते त्यांच्या वाटेने निघून गेले. ह्या व्हावळे काकांची मला इथे भरपूर मदत झाली. शिवाय मला त्यांनी हे देखील सांगितले कि बाळ घरी पोहचलास कि नक्की कळव. मी सुधा त्यांना हो म्हंटल आणि पुढे निघालो होतो.

घाटात एक वळण होत त्या बद्दल मला काकांनी सांगितले होते कि नक्की कुठे जायचे आणि मला झोप जास्त येत असल्याने त्यांनी सांगितलेले मी आता विसरलो होतो. त्यामुळे पार दोन वेळा मी चुकून पुन्हा express highway ला जाऊन परत जुन्या वाटेला येऊन थांबलो होतो. इतक्यात एक पोलीस गाडी गस्त घालत माझ्या पर्यत आली आणि मला विचारले कि काय झाले मी त्यांना सरळ सांगून टाकले रस्ता विसरलो आहे पुण्याला जायचा त्यांनी हि मला मदत केली आणि म्हंटले कि चला माझ्या मागे म मी गाडीवर बसलो आणि निघालो हळू हळू. मग काही अंतर पार केल्यावर मला रस्ता आता उमगला होता. मी त्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले आणि पुढे निघालो ते सुधा त्यांच्या वाटेने निघून गेले.

पहाटेचे ६:०० वाजत होते अजूनही उजाडत नव्हत, मी लोणावळा टोल नाका येथे थांबून मस्त MAGGI चा आस्वाद घेतला. चहा घेला आणि पुन्हा गाडी वर स्वार होऊन पुण्याकडे निघालो. धुकं अजूनही होतच शिवाय मला झोप देखील येतच होती. मी रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी हळू हळू चालवतच होतो (झोपत झोपत). शिवाय काही ठिकाणी थांबत सुद्धा होतो. पण मला झोप काही आता आवरत नव्हती. तरीही मी ठरवल होत की काहीही झालं तही पण थांबायचे ते थेट घरी जाऊनच.

आता माझी झोप पार शिगेला पोहचली होती आणि काही अंतर गाडी हि झोपेतच चालवली ह्यातच घरून फोन देखील येऊन गेला होता हे देखील मला कळले नव्हते. नाशिक फाटा येते सिग्नल ला थांबलो असताना परत घरून फोन आला आणि म मी तो उचलला. तेव्हा घरच्यांच्या जीवात जीव आला कारण मी वेळ दिली होती दोन ची आणि आता दुसरा दिवस उजाडून सकाळचे पावणे आठ वाजले तरीही मी आलेलो नव्हतो तेव्हा ह्यांनी फोना फोनी चालू केली. सुळक्यावर असताना वाघेश्वर च्या फोन वरून फोन केल्यामुळे माझ्या भावाने त्याच्या कडे हि चौकशी केली त्याने घरी धीर दिला आणि सांगितले येईल तो फक्त थोडा वेळ लागेल. माझ घरी फोन वर बोलण झालं आणि त्यांना बरे वाटले तेव्हा. मी ८:३० वाजता घरी पोहचलो होतो. म भावाला फोन करून सांगितले त्याने वाघेश्वर ला सांगितले घरी पोहचल्याचे तसेच मी व्हावळे काकांना सुद्धा सांगितले.

ह्या वजीर सुळका मोहिमेत मला ट्रेक चा तर अतिशय सुंदर अनुभव तर आलेच शिवाय अगदी लहान गावातील महाराष्ट्र देखील पाहता आला शिवाय प्रवास हा काय आणि कसा असतो ह्याचा सुद्धा अनुभव आला. तसेच झोप किती महत्वाची असते हे देखील कळले.

ह्या साठी मला मदत केली असे सर्व माझे मित्र -मैत्रीण,घरचे, वाव्हाळे काका, वाघेश्वर लिमण आणि इंद्रप्रस्थ ट्रेकर ह्यांचा मी कायम ऋणी राहीन.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )