वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्याला व्याजवाडी या गावी पोहचावे लागते. व्याजवाडी हे वैराटगडाच्या पायथ्याचे गाव आहे. लालपरी ची वाट पाहत आता मी गणेश खिंडीत थांबलो होतो. १२ वाजता गाडी येणार असे स्थानिकांनी सांगितले. पण वेळेवर येईल ती लालपरी कसली. ती आली १२:३० वाजता. आणि आता माझी वाटचाल आजच्या दिवसातल्या तिसऱ्या गडाकडे चालू झाली होती. हि लालपरी भुईंज या बस स्थानकावर पुन्हा जाणार होती. पण मला व्याजवाडी ला जायचे होते. मी गाडीत बसल्यावर तसे तिकीट काढताना कंडक्टर काकांना विचारले तर त्यांनी सांगितले कि तुम्ही कडेगाव पूल या बस थांब्यावर उतरा आणि तिथून पुढे व्याजवाडी साठी जावा. आणि कडेगावपूल हे तिकीट हातात दिल आणि कंडक्टर पुढे सरकले.

मी आता मस्त खिडकी जवळची जागा हेरून बसलो होतो. ग्रामीण साताऱ्याचा मस्त अनुभव मला खिडकीतून दिसत होता. लहानशी घरे, समोर आंगण त्याच्या बाजूला असतील तर काही वेळेस जनावर किंवा लहानगे एकमेकांशी आनंदाने खेळणारे शिवाय भर उन्हात आल्हाद दायक असा हिरवा निसर्ग. कारण हा किल्ला वाई पासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर आहे.

साधारण ०१:१५ वाजता मी कडेगाव पुलावर पोहचलो. थोड आजूबाजूला पाहिलं आणि मला दिशा दर्शक पाटी दिसली व्याजवाडी. कडेगाव पूल ते व्याजवाडी अंतर साधारण ३-५ किलोमीटर आहे. म तिथे थांबलेल्या टम-टम वाल्यांना विचारल व्याजवाडी येणार का? कुणीच तयार नाही झाले. म काय आपला चालत निघालो. थोड पुढे गेल्यावर मला एक मुलगा दिसला मी त्याला विचारल दादा व्याजवाडी ला जायचं आहे सोडणार का? तो म्हंटला मी इथेच जात आहे पुढे तरी माझ्या जागेपर्यंत सोडतो अस म्हंटला. मी पण त्याच्या मागे बसलो अगदी २-३ मिनिटात त्याच घर आल आणि मला पुन्हा चालत जाव लागल. थोड पुढे जाताच एक काका आले मी त्यांना देखील हात दाखवला पण ते थोड पुढे जाऊन थांबले. म मी पळत तिथे गेलो आणि त्यांना म्हंटल काका व्याजवाडी ला जायचं आहे. ते म्हंटले कुणाकड मी म्हणलो काका गडावर जायचं आहे. ते म्हंटले बर बस. म काय आता ते मला पूर्ण गडाच्या पायथ्याला सोडणार होते कारण त्याचं घर व्याजवाडीतील शेवटच घर होत. त्यांच्या घरा समोरूनच पायवाट जात होती. मला ते म्हंटले जोडीदार आणायचं कुणीतरी एकट का फिरतोय. सांगितल म त्यांना पण मधला अधला दिवस असल्याने सुट्टी नव्हती मित्रांना. १० मिनिट साधारण आमचा सोबत प्रवास झाला. दुपारचे १:३० वाजत होते. काकांनी मला सोडल आणि पाऊलवाट दाखवली आणि हे पण सांगितल कि जरा जपून जा कारण कालच वणवा पेटला होता. म मी पण जरा सावध झालो गावातून कुणी गडावर येणार आहे का पाहिलं, एक छोटा मुलगा पण दिसला त्याला देखील विचारल पण तो देखील नाही म्हंटला. त्यामुळे आता मी एकट्याने किल्ला सर करण्यास सुरवात केली.

मी जरा जसा पुढे जात होतो तस तस मला काल पेटलेल्या वणव्याच्या खुणा जाणवत होत्या. बऱ्याच जागा अजूनही धुमसत होत्या. त्यातून मार्च महिना आणि दुपारचे कडक ऊन. हळू हळू मी आता वर जात होतो. अधून मधून मागे गावाकडे सुद्धा पाहत होतो आजू बाजूचा परिसर न्याहाळत होतो. काल वणवा पेटल्याने काही ठिकाणी मळलेली पाउल वाट अधून मधून धूसर होत होती. ह्या आधी साधारण ५७ किल्ले पाहून झाले असल्याने अनुभव गाठीशी होता. त्यामुळे थोड थांबून नक्की वाट हीच आहे का हे तपासून पुढे जात होतो. पण किल्ला आता अर्धा झाला होता आणि मला आता वाट नक्की सापडत न्हवती. मी एकदा डाव्या बाजूने वाटेचा अंदाज घेत पुढे जात होतो पण ती वाट पुढे संपत होती मग मी पुन्हा मागे आलो आणि जिथून डावीकडे वळलो होतो तिथून आता सरळ जायचे ठरवले. आणि गड समोर दिसत आहे असा पूर्ण चढ चढू लागलो. पुढे काय वाढून ठेवले आहे हे अजिबातच माहिती नव्हते.

पहाटे घर सोडल्यामुळे सोबत फक्त २ लिटर पाणी, ३ सफरचंद आणि २ संत्रे, २ चॉकलेट्स आणि १ बिस्किटचा पुडा होता. त्यातून ह्याच दिवशी २ किल्ले हे आधीच झाले असल्याने अर्थात २ सफरचंद आणि थोडे पाणी सुद्धा संपले होते. उन्हाळा असल्याने मी जास्त पाणी पेयला हवे होते हे माझे चुकले आणि त्या चुकीची जाणीव मला चांगलीच भोवली.

रखरखीत उन्ह आणि तीव्र चडण यामुळे माझ्या डाव्या पायाला वात येण्यास सुरवात झाली होती. मला मळलेली पाउल वाट हि सापडत नव्हती. तरीही मी हळू हळू पाउल पुढे टाकत होतो पण अगदी पुढच्या काही मिनिटातच मला माझे डावे पाउल काही केल्या हे हलवता येईना. मग मी शांत खाली बसलो. पाणी पिल. २-३ मिनिट विश्रांती केली आणि पुन्हा गड चढाई ला सुरवात केली पण पुन्हा अगदी काही अंतर पुढे गेलो असता माझ्या आता उजव्या पायाला सुद्धा बेक्कार वात आला आणि मी जागीच खाली बसलो. डाव्या पाया पेक्ष्या ह्या पायाला जास्त वेदना होत होत्या आणि आता त्याच बरोबर माझा डावा पाय सुद्धा वात पकडू लागला होता. मला आता पूर्ण हालचाल करता येत नव्हती गडाच्या आड वाटेवर मी एकटाच होतो. गडावर कुणी आहे का नाही माहिती नव्हत. मी आता पूर्ण खचलो होतो, आधी मी पायातले बूट मोजे दोन्ही काढले, bag काढून बाजूला टाकली. मनात देवाचा धावा करू लागलो. थोड पाणी पिल. बिस्किटचा पुडा खाल्ला पण माझे तोंड अजून कोरडे पडले आणि काही सुचेनासे झाले. आता साधारण ३ वाजत असावेत. मला काय कराव हे अजिबात सुचत नव्हत कारण दोन्ही हालचाल आता जवळ जवळ थांबली होती. मी ज्या जागी पडलो होतो तिथून आजूबाजूला कोणतीच वाट दिसत नव्हती किंवा गाव सुद्धा दिसत नव्हते. मी माझी bag बघितली त्यात शिट्टी आहे का नाही बघितल. पण नेमक ह्या ट्रेक च्या वेळेस मी शिट्टी घरी विसरल्याचे लक्ष्यात आले. शिवाय मी काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. काल लागलेल्या वणव्याने पूर्ण डोंगर देखील काळा दिसत होता. त्यामुळे मी कुणाच्या नजरेस पडणे चांगलेच अवघड झाले होते. अर्धा तास जवळ जवळ मी एकाच जागेवर एकटाच बसून कळवळत होतो. थोड्यावेळाने जरा बरे वाटायला लागले . मनात म्हंटले आता मदत हि मागायलाच हवी. म मी जरा मोकळी जागा शोधायचा प्रयत्न केला कि जिथून मला गाव किंवा रस्ता दिसेल अशी जागा शोधली. मग ज्या काकांनी मला व्याजवाडी पर्यंत आणले ते मिलिंदभाऊ मी त्यांना हाक मारू लागलो. ज्या छोट्या मुलाला गडावर येतो का विचारल होत त्याच नाव लक्षात होत त्याला सुद्धा बऱ्याच हाका मारत होतो. पण माझा आवाज कदाचित गावात पोहचत नव्हता. शिवाय माझ्या तोंडाला सुद्धा कोरड पडलेली च होती. जवळ जवळ मी ३० मिनिट गावातून मदत मागण्यासाठी ओरडत होतो पण मला काही मदत मिळेना हे लक्षात आल. म विचार केला आणि १०० नंबर वर फोन लावला. आयुष्यात पहिल्यांदा हा नंबर लावला असावा. फोन उचलला गेला मी माझे नाव सांगितले आणि मी वैराटगडावर अडकल्याची माहिती दिली पण आधी तिकडून फोन उचलून माझीच उलट तपासणी झाली आणि का गेलात कशाला गेलात कोण आहे सोबत वगैरे-वगैरे. पण उत्तर काहीच नाही आणि फोन ठेऊन दिला. मी पुन्हा फोन लावला तर तिकडून एक नंबर देण्यात आला आणि तो वाई पोलीस स्टेशन चा होता. तिथे फोन लावा अस सांगितल. मी तो फोन लावला तिकडून सांगण्यात आल थोड्यावेळ फोन चालू ठेवा त्या प्रमाणे मी फोन चालू ठेवला पण तिकडून फोन कट करण्यात आला. ह्यात मध्ये मध्ये मी गावात हाक मारत होतो. पण गावातून हि काही उत्तर येईना. मग थोड मी शांत बसलो आणि लक्षात आले कि ट्रेक क्षितिज ह्या संस्थेतील एक कार्यकर्त्याचा संदेश मुठे नंबर होता. त्याने एकदा अस लिहल होत कि कधी कुठे ट्रेक मध्ये अडचण आली तर कळवा मला ते आठवले आणि मी त्याला फोन लावला. तो दादा मुंबई ला राहतो. मी त्याला फोन केला आणि सर्व काही सांगितले. त्याने मला फोन वर धीर दिला आणि महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे जे काम बघतात मिश्राम सर त्यांचा नंबर दिला. मी त्यांना फोन लावला. त्यांनी माझी सर्व माहिती घेतली आणि त्यांनी पण मला बराच धीर दिला. शिवाय सगळ काही निट आणि सावकाश सांगितल. पाणी पुरेसे आहे का? खायला आहे का काही? मोबाईल किती चार्ज आहे? गाव दिसत आहे का? रस्ता दिसत आहे का? मी पण सर्व काही आहे अस सांगितल. कारण आधीचा ट्रेकिंग चा अनुभव होता त्यामुळे मी माझे सर्व जपून वापरत होतो. माझ आणि त्या दादा च बोलण झाल त्यांनी मला सांगितल धीर सोडून नका पुढचे नंबर पाठवतो किवा तुम्हाला फोन येतील ते उचला. आणि live लोकेशन share करा. त्यानुसार मी केल.

मला पुढच्या १५ मिनिटात साधारण ४-५ फोन आले होते कुठे आहात नीट राहा शांत राहा आम्ही पोहचत आहोत अश्या स्वरूपाचे. पण ह्यात पोलिसांचा फोन नव्हता बर. फोन वर मी कुणाशी बोलत आहे हे मलाही ठाऊक नव्हते पण सर्वच जण खूप प्रेमाने आणि व्यवस्तीत बोलत होते. तेव्हा मला काळाल कि महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम network किती मोठ्ठ आणि चांगल आहे. कारण मला वाचवण्यासाठी दोन टीम निघाल्या होत्या. त्यातली एक सातार ची आणि आणि एक महाबळेश्वर ची होती. हे एकून मला धीर मिळाला होता. पण मी गावात बघून हाक मारतच होतो त्यामुळे मी ज्या वाटेने वर आलो होतो त्याच्या अलीकडच्या वाटेने ४ तरुण मला वर येताना दिसत होते. ते स्थानिक दिसत होते. कदाचित त्यांना हि मी दिसत होतो. पण मला ते मदत करतील अस वाटत नव्हत. आता मला चौकीतून फोन आला आणि चौकशी चालू झाली मी त्यांना सांगितल मी मला महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे मिश्राम सर मदत करत आहेत हे एकून त्यांनी फोन ठेवून दिला. साधारण ४:३० वाजता गावातून मला एक तरुण अक्षय जाधव नावाचा मी ज्या वाटेने वर आलो त्या वाटेने येताना दिसला. मी मनोमन देवाचे आभार मानले. त्या आधी त्याने मला फोन सुद्धा केला होता. आणि तो झपा झप पाउल टाकत माझ्या दिशेने येत होता. तो मला दिसावा म्हणून तो मुद्दाम लाल रंगाचा शर्ट घालून आला होता. हे मी मिश्राम दादा ला सांगितल कि मला गावातून मदत मिळत आहे. तुम्ही बाहेरून पाठवू नका कुणाला. ते हि ठीक आहे म्हंटले आणि खाली सुखरूप पोहचलात कि सांगा नक्की. आता अक्षय दादा ३० मिनिटात माझ्याकडे पोहचला होता. अधून मधून मी त्याला माझी दिशा सांगत होतो. आणि अखेर माझी आणि अक्षय दादा ची भेट झाली मला आता चांगलाच धीर आला होता. शिवाय मी म्हगाशी म्हटल्या प्रमाणे दुसर्या वाटेने जे तरुण दिसत होते त्यात मारुसरे दादा आणि त्याने मित्र होते त्यातील एक दादा भारतीय सैन्यात नोकरी ला होता. हे आता अक्षय दादा शी लांबून बोलत होते कारण ते अजून मी असलेल्या ठिकाणी आलेले नव्हते. पण मी आणि अक्षय दादा ने आता गड उतार होयला सुरवात केली होती. पण वरून मारुसरे दादांनी आम्हाला थांबायला सांगितल तर अक्षय दादा म्हंटला कि पुढ या मोकळ्यात थांबतो. तोवर अक्षय दादा बऱ्याच आड वाटांनी मला हळू हळू खाली नेत होता. काही ठिकाणी तर अगदी ९ - १० फुटी सरळ उतरव लागत होत. दादा आधी पुढे जात आणि आग मला म्हणयचा या इकडून असे सांगत होता.

अखेर मी जिथं रस्ता चुकलो होतो त्या ठिकाणी आम्ही पोहचलो आणि आता दुसऱ्यावाटेने आलेले मारुसरे दादा आणि त्यांचे मित्र भेटलो. त्यांनी माझी सगळी चौकशी केली. मी कुठून आलो कसा अडकलो. त्यांनी माझ्यासाठी एक पाण्याची बाटली एक बिस्कीट चा पुडा सुद्धा आणला होता. तो मला देऊ केला. त्यांनी म अक्षय दादा ची पण चौकशी केली तो कुणाचा कुठ राहतो असे सगळे. गडच्या अंतिम टप्प्यावर त्यांनी माझा एक video सुद्धा काढला. मी कुठून आलो कसा अडकलो आणि मला ह्या सर्व जणांनी कसे वाचवले शिवाय माझ्या आधार कार्ड चा pic सुद्धा घेतला. मला त्यांनी कारण सांगितले कि ४-५ महिन्या आधी दोन तरुण असेच गडावर गेले आणि गडावरील मंदिरात आत्महत्या केली. म्हणून हा सारा खटाटोप. पण मी त्या सर्व दादांना विनंती केली कि कृपया हे कुठे viral करू नका कारण ह्या सगळ्यात मला घरून फोन आले होते आणि मी घरी ह्यातल काहीच सांगितल नव्हत. ते पण म्हंटले ठीक आहे. आणि हे सगळ झाल्यावर गावात पोलिसांनी कालवल कि गडावर एक तरुण अडकला आहे ते.

आता माझा गड उतार पूर्ण झाला होता. मी महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चे मिश्राम दादा ह्यांना सांगितल मी पूर्ण गड उतार सुखरूप झालो आहे आणि त्यांचे खूप खूप आभार देखील मानले. पूर्ण गावात आता माझी चर्चा चालू होती. सगळ्या काकू, काका मला म्हणत होते काय दादा जोडीदार आणायचं कुणीतरी एकट येऊ नये. मी सगळ्याचं ऐकत होतो. आणि आता मी मिलिंद भाऊ च्या घरी चहा घेतला. सर्वांनी जेवण्यासाठी थांब्याचा आग्रह केला पण तो टाळून पुन्हा नक्की येईन अस सांगून अक्षय दादा आणि मित्रांनी मला बस स्थानकावर सोडल बस मिले पर्यंत थांबले सुद्धा. आणि सांगितल कि दादा पुन्हा एकटे येऊ नका.मला घरी पोहचायला रात्रीचे १०:३० झाले होते. साधारण ३-४ महिन्या नंतर मारुसरे दादा आणि सर्व मित्र ते आर्मी मधल्या दादाला सोडायला पुण्यात आले होते ज्यांनी मला वाचवल होत ते सगळे माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांना बाहेरच कल्पना दिली होती कि तो प्रसंग मी अजून घरी सांगितला नाहीये. तर ह्या मित्राने सर्व काही सांभाळून घेतल होत तेव्हा. मग आई ने मला विचारल होत काय रे हे कसे काय इतके मित्र झाले. म्हंटल गावात गेलो कि होतात मित्र अशी थाप पण मारली होती.

हा अनुभव माझ्या घरच्यांना सुद्धा अनुभव माहिती नव्हता पण हे वाचल्यावर मला पुढे ट्रेक ला सोडतील कि नाही शंकाच आहे.आणि मी पण आता मनाशी निश्चित केल कि कोणत्या गडावर एकट नाही जायचं. आणि तुम्ही देखील असे धाडस करू नका. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम चा नंबर खाली देत आहे. माझ गडावर जाण झालच नाही त्यामुळे वरील img गुगल वरून घेतला आहे.

7620230231 महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )