पुण्याहून कसे जाल मोहन दुर्गावर

नमस्कार मित्रांनो, सिंदोळा नंतर पुढचा कोणता किल्ला करायचा हे मनात चक्र चालूच होते पण नक्की कोणता करावा पर्वत गड उर्फ हडसर की मोहन दुर्ग? ईद आणि गणपती अश्या सुट्ट्या सलग आल्या मुळे मी घरात थांबणार नव्हतो हे तर निश्चित होते. म नक्की कुठे जायचं आधी नचिकेत आणि रोहन यांना विचारलं होत माण देशातील किल्ले करूयात पण दोघेही गणपती मध्ये बाहेर नाही येणार बोलले होते. म काय अजून एक दोन जणांना विचारलं होत. पण ते ही नाही बोलले होते. शेवटी पुतण्या आणि एक दोन जण घेऊन राजगड करायचा निर्णय केला होता. पण आदेश ची सोमवार ची सुट्टी अचानक रद्द झाल्याने तो पण प्लॅन बदलून म फक्त एक दिवसात मोहनदुर्ग करायचा नक्की केलं. आणि आमचे पुतणे रद्द झाले.

१५ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ वाजता स्वारगेट येथे जमणार होतो. आदल्या दिवशी रात्री अचानक अथर्व वडके उर्फ जाड्या न आदित्य करडे उर्फ काळ्या कपाळाचा माणूस तयार झाले. पण अथर्व ला कसे एकदम सगळ रॉयल लागते त्यामुळे त्याने मला फोन केला आणि बोलला "काय अहो सौ बस कशाला गाडी ने जाऊ की!" मी थेट नाही बोललो त्याला आणि भाऊ जरा नाराज झाले पण तरीही गडावर येयला तयार झाले. म आदेश ला सांगितलं आपण सकाळी ६ वाजता स्वारगेट ला भेटुयात म्हणुन. हो बोलले हे मला फोन वर पण आदल्या दिवशी गणपती बघत फिरत बसले आणि घरी पार १ वाजता गेले. म काय जाड्या अथर्व झोपला तो पार पाहिली गाडी निघून गेल्यावर उठला. त्यामुळे आमची वेळेची गणित सगळी चुकणार होती. मला माझ्या काका ने सकाळी ५:४५ वाजता स्वारगेट ला सोडलं आणि तो निघून गेला. मी जसा स्वारगेट ला पोहचलो तसे पुन्हा यांना फोन चालू केले. पण माझे, आदेश आणि आदित्य चे बोलणे झाले होते मी त्यांना सांगितले होते म्हटल त्या जाड्या ला रहुद्या आणि तुम्ही चला. तरीही त्यांनी एक शेवटचा प्रयत्न केला न नेमका भाऊ तयार होऊन उशिरा का होईना आला. पण पहिली गाडी गेली असल्याने आता पुढची गाडी येयला बराच वेळ लागणार होता. म काय काळ्या कपाळाचा आणि जाड्या ह्यांनी स्वारगेट बस स्थानकावर मस्त झोपण्याचा आणि आदेश ला चीडवण्याचा आनंद घेतला. ह्यात आदेश ला रक्त बिज हे नाव पडले. 😀 वैतागून आता अथर्व आणि आदित्य बोलले की ७:३० वाजेपर्यंत गाडी नाही आली तर आम्ही निघून जाणार. पण गाडी आली ७:३० वाजता पण बस स्थानकावरून बाहेर पडण्यास ८:०० वाजले. आमचा प्रवास चालू झाला होता. पण ह्यात पण शांत राहणार हे जमतच नाही ना. तिकीट काढताना पार कंडक्टर काका ना सुध्दा हसु येईल असे तिकीट मागितले. "३ पुरुष, १ महिला" हे ऐकून कंडक्टर काका पण हसायला लागले. अश्याच गप्पा करत करत आम्ही साधारण १०:३० वाजता भोर मध्ये पोहचलो.

उतरल्या उतरल्या शिरगाव ला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली तर तिथे त्यांनी सांगितलं की "शिरगाव ला इथुन बस च जात नाही. म दुर्गाडी ला बस जाते पण ती संध्याकाळी ६ वाजता असते आणि रविवारी गाडी नसते." हे ऐकुन आम्ही दोन मिनिट हँग झालो. आणि ह्या ३ घांनी आता माझ्या नावांनी खडे फोडायला सुरवात केली होती.

त्यांना बोललो चला आधी नाश्ता करू आणि म पुन्हा चौकशी करू. म काय आम्ही आता सर्व छान हॉटेल शोधू लागलो आणि ते लगेच बस स्थानकाच्या बाहेर मिळालं पण. म मस्त मिसळ आणि बटाटा भजी या वर ताव हाणला.
त्या नंतर म्हंटल पुन्हा एकदा चौकशी करून येऊ काही पर्यायी मार्ग आहे का ते. तोवर ह्यांनी मला काही कळत नाही कुठं पण आणतो असे बोलून रिकामे झाले होते. कारण अथर्व ला काजवे पाहु म्हणुन अर्धवट काजवे पाहूनच आम्ही परत आलो होतो त्यामुळे त्याला तर माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता.
पुन्हा चौकशी करायला गेलो आणि काकांनी आम्हाला एक जीप वाल्याचा बडे काकांचा नंबर दिला. आम्ही लगेच त्यांना फोन लाऊन चौकशी केली. आमच्या नशिबाने काका होते तिथं नदी जवळ थांबलेले, पाटील डॉ. यांच्या दवाखाना आहे तिथे असतात ते. आम्ही शोधत शोधत तिथे गेलो. बडे काका आम्हाला भेटले आणि आम्हाला शिरगाव पर्यंत सोडायला तयार ही झाले पण सर्वांचे ते १००₹ घेतात त्यांनी आमच्याकडून १५०₹ प्रत्येकी घेतले आम्हाला दुसरा पर्याय पण नव्हता. पण ते लगेच काही निघणार नव्हते अजुन काही लोक येत आहेत का हे पाहायला पुन्हा ते बस स्थानकावर गेले.
पण ह्या सगळ्या मध्ये बडे काकांच्या गाडीतून एक कार्यकर्ता आमच्या सोबत येणार होता. तो इतका वाढीव होता ना की बास, करडे ने त्याच्या कडे पाहताच नुसते हसायला सुरवात केली. त्याचे कारण ही तसेच होते. उंचीला थोडका, Spike hire कट होता, काळा गॉगल लावला होता, एकदम घट्ट अशी जीन्स आणि टी शर्ट, खाली पायात बुट होते आणि एका हातात चावी होती न ती फिरवत होता. आमची ही त्याच्या कडे नजर जाताच आम्हाला पण हसू येत होते पण आम्ही कंट्रोल मध्ये होतो पण आदित्य ला ते काही केल्या कंट्रोल च होत नव्हते. ह्यात त्या मुलाने आम्हला काहीही न करता फक्त त्याचे attitude दाखवत इतकं हसवलं ना की बास. अखेर मी म्हटल चला जरा खाली जाऊन नदी जवळून पाहुयात. मग काय खाली जाऊन नदीवर जरा मज्जा केली.
एक ५ मिनिट होताच आम्हाला काका बोलवायला आले ए चला रे पोरांनो. म काय क्षणाचा पण विलंब न करता आम्ही गाडीत जाऊन बसलो. गाडी मध्ये बसलो तरीही करडे चा कल्ला चालुच होता. त्यात काकांनी गाडी पण अतिशय उत्तम ठेवली होती. खाली जोडलेले छायाचीत्र पाहिल्यावर तुम्हालाही लक्षात येईल.

थोड पुढे आल्यावर काकांनी गाडी मध्ये २ सीट वाढवले लगेच करडे माझ्या कानात सांगून रिकामा झाला आता ५०₹ कमी देयचे. नंतर अजून २ सीट वाढले करडे भाऊंची पुन्हा तिचं चर्चा.
आता आम्ही प्रवासाच्या अंतिम टप्प्यात प्रवासाला सुरवात केली होती. आम्ही शिरगाव ला पोहचे पर्यंत आजूबाजूला इतके मस्त मस्त दृष होते त्यात निरा - देवघर धरणाचे बॅकवॉटर हे अगदी दुर्गाच्या पायत्या पर्यंत पसरलेले होते. आणि आमची ही टीम पाणी दिसल की कधी त्यात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेतो असे होत होते. काही ठिकाणी तर इतके छान छान दृष होते की आम्हाला आमची खाजगी गाडी नसल्याचे कायम जाणीव करून देत होते त्याच बरोबर मी ह्यांना सांगितलं होत ना की बस ने जायचं त्यामुळे वेळोवेळी मला शिव्या देणे हे ही चालूच होते. त्याच बरोबर बडे काका आणि तो attitude दाखवणारा मुलगा ह्या दोघांवर ही जोक चालुच होते.
साधारण १ तासाच्या प्रवासानंतर आम्ही शिरगाव ला पोहचलो. उतरल्यावर काकांनी सांगितले तुम्हाला इकडून ३ किलोमीटरवर चालत जाऊन मग किल्ला चढाई करता येईल. आम्ही माना डोलावल्या आणि काकांच्या हाती पैसे देऊन पुढे निघालो. इथे पायथ्या ला आम्ही पुन्हा २-४ जणांकडे चौकशी केली आणि वाटेत दिशा दर्षकाचे फलक वाटेत लावले आहेतच.
अलीकडची वाट ही खुप फिरून जाते शिवाय चार चाकी सुद्धा थोडी वर जाऊ शकते. पुढे अजुन एक पाऊल वाट आहे ती मस्त गर्द झाडीतून वरती जाते. हा दुर्ग अल्प परिचित असल्याने माणसांनी केलेला कचरा इथे जवळ जवळ नाहीच बघायला मिळत. अगदी सुरवाती पासुनच गर्द झाडी असल्याने आल्हाद दायक वातावरण अगदी गड माथ्या पर्यंत असेच आहे. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात इथे जळवांचा त्रास होऊ शकतो. ट्रेक करत असताना वेळोवेळी तपासले पाहिजे कुठे जळवा चिकटल्या आहेत की नाही. आम्हला गड माथ्यावर जळवा चिकटल्या होत्या.
अतिशय दाट झाडी असल्याने इथे पाऊस पडण्याचे प्रमाण ही अधिक आहे. त्याचमुळे इथे पाऊल वाटेवर देखील शेवाळ जमलेल दिसेल जर तुम्ही पावसाळ्यात इथे जात असाल तर.

मग काय गड चढताना काही ठिकाणी जिथे झाडी कमी होत होती त्या ठिकाणी आम्ही थांबुन आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो. फोटो काढत होतो आणि पुढे पुढे जात होतो.
अधुन मधुन पावसाच्या सरींचा शिडकावा होत होता तसेच ढग सुध्दा येत होते. खूपच भारी वाटत होत.
दुर्गाच्या अंतिम टप्प्यात चढाई करताना आम्हाला दोन तरुण उतरताना भेटले. त्यांनी सांगितले जननी मातेच्या मंदिराच्या जवळ जळवा आहेत तिथे काळजी घ्या. बाकी मजा मस्ती करत त्यांना राम राम ठोकला आणि पुढे निघालो. इथला कातळ टप्पा जरा पावसाळ्यात जरा रिस्की होता. शिवाय काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या ही दिसत होत्या.
साधारण २ तासाच्या चढाई नंतर आम्ही दुर्ग माथ्यावर पोहचलो. सर्व प्रथम डाव्या हाताला एक पाण्याचे टाके दिसले. तिथुनच थोड पुढे आल की जननी मातेचे मंदिर आहे. मंदिरातील जननी मातेची मूर्ती अतिशय सुंदर आहे.
याच ठिकाणी आम्ही जरा पेट पुजा केली. संघाची प्रार्थना म्हंटली आणि दुर्ग पाहण्यासाठी निघालो. परंतु कारवी इतकी माजली होती की आम्हाला वाट काढणे खुपचं अवघड झाले. ह्याच मध्ये माझ्या पायाला जळवा लागल्याचे लक्षात आले. लगेच त्याला झटकले न पुढे निघालो. पण अजुन पुढे गेल्यावर लक्षात आले की खूपच वाढले आहे. म एक मताने आम्ही मागे फिरलो. मागे फिरून पुन्हा आलो त्या वाटेने आम्ही जननी मातेच्या मंदिराकडे निघालो पण काय कसे हे कळले नाही पण अथर्व चा पाय घसरला आणि तो पडला. आदेश ने आणि आदित्य ने त्याला पडताना पाहिले त्यामुळे ते बेक्कर हसु लागले कारण तिथे पडण्याचे असे काहीच कारण नव्हते. ही मज्जा आम्ही घेतच होतो. त्यात अथर्व भाऊंनी डायलॉग मारला की "आयला मी शेवटचे कधी पडलो हे आठवतच नाही" हे वाक्य पूर्ण होताच अथर्व भाऊ पुन्हा पडले. आणि हे आता आम्ही तिघांनी पाहिलं होत, आणि आम्हला आता हसु च आवरेना कुणाला कारण साधी पाऊल वाट होती आणि हा भाई उभ्या उभ्या पडला. मग काय मोककर हसलो आम्ही जवळ जवळ ३-४ मिनिट जागेवर थांबुन पार गाल न पोट दुखे पर्यंत हसलो. आणि स्वतःला सावरत दुर्ग उतराई ला सुरवात केली. पाऊस झाल्याने उतराई आमची खुपच अवघड झाली होती. आम्ही सगळे जपुन पाऊल टाकत होतो. अथर्व भाऊ दोन वेळा पडले असल्याने आता ते कोणतीही रिस्क घेयला तयार नव्हते ह्यामुळे माझा पण आत्मविश्र्वास थोडा डगमगला होता मग काय मी पण सँडल काढून हातात घेतले आणि उतराई ला सुरवात केली. आदित्य आणि आदेश मला बोलले अहो का टेन्शन घेताय नाही पडत तुम्ही आम्ही आहे ना! मी बोललो मला रिस्क नाही घेयची. असे म्हणत आम्ही एक टप्पा पास केला आणि चेष्टा मस्करी मध्ये आदित्य बोलला की थांब जाड्या मी तुला कसं पडतात ते दाखवतो, आणि बधिर खरचं एका मोठ्या दगडावरून उडी मारायला गेला आणि वाईट पडला ना राव. मी आणि आदेश ने विचारलं सुध्दा त्याला लागलं का रे उगाच का मस्ती करतो म्हणुन तर तेव्हा हसला आणि काही नाही झालं असेही बोलला. पण त्या नंतर दोन आठवड्या नंतर भेटला तेव्हा म्हणत होता सौ मी करायला गेलो नाटक पण लागल ना जोरात. अजुन दुखत कधी तरी म्हणुन.
आता आम्ही हळु हळू पुढे पुढे येत होतो पण अर्ध्या वाटेत आल्या नंतर मध्येच वाटेत कोणत्या तरी पक्षी/ जीवाचे घरटे दिसले ह्यात साधारण ५-६ अंडी असावित आम्ही ते पाहिले त्याचे pics काढले आणि पुढे निघालो.
पोरांना आता पोहायची ओढ लागली होती काहीही झालं तरी आज पोहूनच जायच. मग काय दुर्ग पूर्ण उतार झाल्यावर आम्ही तेथील स्थानिक २-४ वाटसरू दिसले त्यांना विचारलं आम्ही इथे पोहू का म्हणून सर्व हो म्हंटले. पण आदित्य चे वेगळे च काहीतरी उडी मारू शकतो का हे ही त्याने विचारलं तर त्यातले २ जणांनी नाही नका उडी मारू खाली दगडी आहेत. हो नाही करत आम्ही मस्त इथे पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला आणि आदित्य भाई ने उडी देखील मारली खाली लागल त्याला. तरी भाऊंची मस्ती काही कमी होईना. साधारण अर्धा तास पोहण्याचा आनंद घेतला आणि बाहेर येऊन आवरले.
ज्या काकांनी आम्हाला सोडले त्यांना बोलण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला पण ते बोलले की मी काही येत नाही आता. तिथेच वाटेत थांबा तुम्हाला कोणती पण गाडी मिळेल या त्या गाडी ने. मग आम्ही तिथे जरा चौकशी केली तर तेव्हा आम्हाला कळलं की काकांनी आमच्या कडून सकाळीच प्रत्येकी ११०₹ जास्त घेतले आणि आम्हाला व्यवस्थित चंदन लावले. आता आम्ही आम्हला कोण लिफ्ट देत आहे याची वाट पाहत बसलो तिथेच रस्त्यावर. एक टेम्पो तर पूर्ण रिकामा गेला पण गाडी नाही थांबवली. सगळ्यांना त्याचा राग आला त्यामुळे सगळ्यांनी त्याला मनापासून शिव्या पण दिल्या. जवळ जवळ अर्धा पाऊण तास वाट पाहिल्या नंतर आम्हाला एका ग्रुप ने लिफ्ट दिली ते थेट भोर पर्यंत.
आम्ही त्यांना त्यांना उतरल्या नंतर मनापासुन धन्यवाद बोललो आणि भोर बस स्थानका कडे निघालो. त्यांनी सोडलं तिथून बस स्थानक साधारण एक दीड किलोमीटर असेल. आम्ही ते पटा पट अंतर कापल. वाटेत मस्त वडा पाव आणि चहा घेतला आणि बस स्थानकावर बस ची वाट पाहू लागलो. इथे चंद्राचे अतिशय विलोभनीय दर्शन झाले.
इतक्यात स्वारगेट ची बस आली आणि आमचा परतीचा प्रवास चालु झाला. इथे पण तिकीट काढताना आदित्य ने सांगितलं की ३ पुरुष आणि एक महिला हे ऐकताच शेजारी बसलेली मुलगी हसु लागली. नंतर पुन्हा आदित्य अथर्व वर जोक मारतच होता. असाच आमचा प्रवास मजेत झाला. खुप साऱ्या मोहन दुर्गाच्या आठवणी घेऊन आम्ही सुखरुप परतलो.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
स्वारगेट ते भोर (S.T) ₹७०/-
भोर ते शिरगाव ₹९८/-
एकूण खर्च ₹१६८/-

परतीचा एकाचा खर्च :
भोर ते स्वारगेट ₹२८०
एकूण खर्च ₹२८०/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
मोहन दुर्ग हा अवघड नाही परंतु काही ठिकाणी काळजी घेणे हे महत्वाचे आहे.
दुर्गावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत पहिली वाट शिरगाव गावातून वाट जाते हि सोप्पी आणि मळलेली वाट आहे पण हि खूप फिरून जाते.
दुसरी वाट हि दुर्गाडी गावातून जाते. हि वाट जास्त मळलेली नसल्याने शिवाय गर्द झाडीतून जाते त्यामुळे आपल्याया वाटाड्या नेणे गरजेचे आहे.
किल्ल्यावर ३-४ जणांसाठी राहण्याची सोय मंदिरात होऊ शकते.
गडांवर केवळ पावसाळ्यात पिण्याचे पाणी असते.
गडावर जेवणाची सोय हि आपल्यालाच करावी लागते.
इथे जळवा असल्याने आपल्याला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सोबत मीठ किंवा तंबाखू ठेवावी जळावा चीटकल्या नंतर ते सहज निघत नाहीत.
स्वारगेट वरून भोर ला जाणारी पहिली गाडी सकाळी ६:०० वाजता आहे त्यानंतर सकाळी ८:०० वाजता आहे नंतर एक एक तासाने आहेत बस. पण बोर वरून दुर्गाडी ला जाणारी दिवसभरातून एकच गाडी आहे ती पण संध्याकाळी ६ वाजता बोर मधून सुटते. रविवारी हि गाडी नसते.

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही