How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )




भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.
राजगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे.

शेजारच्या वाड्यातला रुषिकेश खूप दिवस झाले माझ्या मागे लागला होता सौऱ्या किल्यावर जायचं आणि तुझ्याच बरोबर. आणि त्याच काळात आमच्या वाड्यातला तेजस भाऊ दुबई वरून परत आले होते. जास्त त्रास नको म्हणून ह्यांना सासवड जवळच्या सोनोरीच्या म्हणजेच म्हलार गडावर नेऊन आणल होत ते पण दिवाळीत लक्षुमी पूजनाच्या दिवशी. ह्यात हेंच काही मन भरलं नाही.(स्वाभाविकच होत)
आणि परत एक दोन दिवसांनी हे चालू झाले ना सौऱ्या किल्यावर जायचं पण भारीतल्या. म्हंटल ठीक आहे, आणि माझ्या तोंडून नाव निघून गेल भोरगिरी ते भीमाशंकर. ह्याच कारण अस कि ह्यांना मि न पाहिलेला आणि एक दिवस बाहेर राहता येईल असा ट्रेक करायचा होता. मग काय दिवस ठरला २३-२४/११/२०१९. सगळ नियोजन अर्थात माझ होत. त्यानुसार एक whatsapp वर एक ग्रुप बनवला. काय घेयचे काय नाही मी त्यावर सगळे पाठवले. पण एकदा सांगितले आणि त्यात शंका नाही तो आमचा तेजस कसला. त्याला फोन वरून वेगळी माहिती दिली.

रुषि आणि तेजस हे माझ्या ऑफिस पाशी येणार आणि मग आम्ही तिघे एकत्र निघणार अस ठरल होत. तस झालं सुद्धा,


ते आले नाशिक फाट्यापर्यंत आणि आता आमचा तिघांचा प्रवास एकत्र भोरगिरी च्या दिशेने चालू होणार होता. त्यासाठी आम्हाला आधी राजगुरुनगर ला पोहचावे लागणार होते, म चौकशी केली बस ची वाट पाहिली आणि ती आल्यावर आम्ही निघालो. त्या दोघांचा आनंद अगदी चेहर्यावर दिसत होता पण रुषी च्या मनात वेगळ होत, कारण तेजस च्या गप्पांनी हे भाऊ हळू हळू बोर होत होते. मी मात्र निवांत होतो. ह्याचात आनंद घेत आम्ही राजगुरुनगर पोहचलो. सगळ्यात आधी बस ची चौकशी केली भोरगिरी ची. कळाल कि येयला वेळ होता म काय आधी पेट पूजा केली म थोड साहित्य घेतल कि जे राहील होत. आणि लाडक्या लाल डब्या ची वाट पाहत होतो. ह्यातच मी माझ्या ऑफिस मधल्या ऐक मित्राला भेटायला बोलावले, तो आला पण आमच्या साठी येताना मस्त थंड पेय घेऊन आला. अर्थात आम्ही घेतल ते. आणि त्या भाऊ ने हे देखील संगीतल कि हि वेळ योग्य नाही, रात्र भर थांबा माझ्याकडे आणि सकाळी उठून जावा. आणि वर हे पण सांगितल कि जनावर आहेत वाटेत. झालं इथेच आमच्या तेज्या भाऊंची फाटली. आणि रुषि कडे ह्याचे गाणे चालू झाले ह्या सौऱ्या ला ओवाळून सोडले आहे, पुण्याची बस पकडून आपण परत जाऊ. मी ह्यांना धिर दिला आणि तयार केले. थोड्याच वेळात गाडी आली आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. हळूहळू एक एक प्रवासी आपल्या ठिकाणी उतरत होते. शेवटी एक वेळ अशी आली कि त्या बस मध्ये प्रवासी म्हणून आम्ही फक्त तिघेच.


खूप भारी वाटल होत. पण आता आमचे रुषी भाऊ तेजस च्या गप्पांनी पार बेजार झाले होते. आणि अखेर भोरगिरी आले. आम्ही उतरलो आणि बस पुढे गेली.

जशी बस पुढे गेली तसा एकदम अंधार झाला होता. लगेच कोणालाच काही सुचेना पण आमचे तेजस दादा इथे आता खऱ्या अर्थाने फाटायला सुरवात झाली होती. पूर्ण अंधार आजूबाजूला कोणीच नाही. मग आम्ही टोर्च काढून जरा पाहणी केली बाजूला मंदिर होते शिवाय नदी पण होती म्हंटल इथेच थांबू मस्त जेवण करू आणि झोपू. ह्यावर लगेच हो म्हणेल तो तेजस कसला. नाहीच म्हंटला आपण मदत मागू कोणाच्या तरी घरी, कसे बसे आम्ही त्याच एकून त्या गावातल्या लाईट आणि घराच्या दिशेने गेलो. एक घर उघड होत म त्यांना हाका मारल्या, त्यांना सगळ सांगितल. ते म्हंटले कि ठीक आहे करा इथेच जेवण आणि झोपा. त्या काका काकूंनी आम्हाला खूप मदत केली. रात्रीच्या अंथरून पांघरून त्यांनी ज्यादाचे दिले कारण थंडीचे दिवस होते आणि आम्ही उघड्यावर झोपणार होतो. जेवण करून लगेच आम्ही कुठे झोपणार होतो. पण ते गाव आधीच झोपलं होत. आमची भरपूर अंधारातील फोटूग्रापी झाली.


आणि आता वेळ झाली होती ती झोपायची. मी आधीच दोन तीन वेळा त्या काकांना विचारले होते कि भीती चे काही आहे का?? ते म्हंटले बिनघोर झोपा. आणि तस असत तर आम्ही तुम्हाला बाहेर झोपूच दिलच नसत. ह्यात पण ऐकतील ते तेजस दादा कसले स्वतः घाबरलेले होतेच वर आम्हाला पण घाबरवत होते इतक होऊन तेजस दादा आमच्या दोघांच्या मध्ये झोपले. त्यात ह्या रुषी भाऊंच वेगळच तेज्या तू काळजी नको करू माझी झोप सावध आहे म्हणे. ती पूर्ण रात्र तेजस ची घाबरण्यात,मी त्याला धीर देण्यात आणि रुषी दादा आम्हाला सावध झोप कशी असते हे दाखवण्यात गेली.

मग काय सकाळी जरा उजाडत आहे पाहून आम्ही पण आमच आवरल त्या परिवाराचे आभार मानून आम्ही पुढे निघालो. सकाळी साधारण आम्ही ६:३० वाजता घर सोडले आणि एक पाचच मिनिटांत आम्हाला मस्त पक्ष्यांचा आवाज येऊ लागला अतिशय प्रसन्न वाटत होत. आणि पुढच्या काही मिनिटांत आम्ही ऐक धबधबया जवळ पोहचलो. मग काय भरपूर फोटू काढले


त्यात मी फाफललो आणि त्या धबधबयात पडलो, कसाबसा बाहेर आलो आणि मग काय ह्या दोघांना आयती संधीच मिळाली मला चिडवायची. ती मजा घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि फक्त १५ च मिनिटामध्ये आम्ही भोरगिरी ह्या किल्ल्यावर पोहचलो. सूर्य उगवायचा होता. म गडाच्या पूर्वेच्या ऐका टोकाला आम्ही सूर्योदय पाहण्यात गुंग झालो.


जितके ते द्रुश्य डोळ्यात साठवता येईल तितके साठवले आणि गड भ्रमंती चालूच ठेवली. प्रचंड गवत वाढले होते, तरीही जितक पाहण शक्य होत ते पाहिलं. ह्या दोघांना हा अनुभव तसा नवीनच होता पण माझ्या सारख्या भटक्याला सह्याद्री मधला सूर्योदय पाहण नवीन नसल तरी अनुभवांची शिदोरी भरायला मिळाली. ह्या किल्ल्यावर फारशी भटक्यांची गर्दी नसते. पण ह्या गडावर आम्हाला फक्त एकच कुटुंब दिसले ते पण हा गड पाहण्यास आले होते. मग काय त्यांच्याशी ओळख केली शिवाजी महाराजांची गाणी म्हंटली आणि पुढे निघालो. किल्ल्याची भ्रमंती करून जितका गड पाहता आला तो पहिला.
किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर कातळात खोदलेल्या दोन गुहा आणि त्यांच्या बाहेर फ़डकत असलेला भगवा झेंडा दिसतात. एक छोटा ओढा ओलांडुन आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याषी पोहोचतो. पायथ्यापासून गुहेकडे जातांना शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. पायथ्यापासून ५ मिनिटात आपण पहिल्या गुहेपाशी पोहोचतो.


पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा (गर्भगृह) असे दोन भाग आहेत. ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची टाक आहेत. गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत देवीची मुर्ती बसवलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या शेजारी पिंडी व नंदी आहे. पहिल्या गुहेच्या पुढे दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा प्रशस्त आहे. या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. ओस्ररीत दोन पिंडी आणि नंदी आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. या गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेउन) डोंगर चढायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. समोरच एक सातवाहानकालिन पाण्याचे टाक आहे. या टाक्याचे तीन भाग असून दोन भागात पाणी आहे.


तर तिसरा भाग कोरडा आहे. या कोरड्या टाक्यात एक वीरगळ ठेवलेली आहे. हे टाक पाहूम डाव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात केल्यावर एक पाण्याच कातळात खोदलेल पण बुजलेल टाक दिसत. या टाक्याच वैशिष्य़ म्हणजे त्याच्यावर एक शंकराचे छोटी पिंड कोरलेली आहे. पुढे गेल्यावर काही अंतरावर पाण्याच जोड टाक आहे. डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर पाण्याच एक टाक आहे. या टाक्याच्या बाजूला एक पूर्ण झिजलेली मुर्ती शेंदुर फ़ासून ठेवलेली आहे. किल्ल्याच्या डोंगरावर गर्द झाडीत काही पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या अलिकडेच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या व एक बुजलेली गुहा पाहायला मिळते.ती पाहुन परत पायवाटेवर आल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते.
आम्ही आता गड उतरून भीमाशंकर ला जाणार होतो ह्यातच आमच्या तेजस भाऊंनी उभ्या उभ्या कसे पडतात ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले. हा आनंद घेऊन आम्ही मोठ्या चांगल्या मळलेल्या वाटेने भीमाशंकर कडे साधारण सकाळी ८:३० वाजता निघालो.

हळू हळू चालत आता आम्ही भोरगिरी आणि भीमाशंकरच्या जंगलात आलो होतो सकाळचे ९ वाजत होते भूक लागली होती ह्याच वेळेस आम्हला तेजस भाऊंनी ब्रिटीश styl न्याहरी कशी असते हे दाखवले म्हणजे पावला बटर, सॉस आणि लोणच लाऊन खायचे.


हे झाल्यावर आम्ही पुन्हा भीमाशंकर च्या दिशेने निघालो थोड चालून म्हणजे साधारण अर्धा तास चालून गेल्यवर आम्हाला अचानक २०-३० गुरांनी आमची वाट अडवली आणि सगळे आमच्या कडे असे पाहत होते आम्ही जाम घाबरून मधेच डोंरात शिरलो आणि आड वाटेने आम्ही त्यांना पार केले ह्यातच आमची १५ मिनिट गेली. आणि आम्ही तो अनुभव घेऊन पुढे निघालो. काही वेळानी आता भीमाशंकर चे जंगल घनदाट झाले होते आमचे तेजस भाऊ परत घाबरले होते. राजमाची चा काही भाग असा असल्याने मला फारसे नवीन नव्हते पण हे जंगल राजमाची पेक्षा दाट होते आणि माझी पण फाटली होती पण सांगणार कोणाला ह्या फट्टू ला मग तर कल्याणच झालं असत. तसच मन घट्ट केल आणि चालत राहिलो.


मध्ये मध्ये वाटेत खुणा पण केल्या आहेत त्या दिशेने आम्ही जातच होतो आणि आम्हाला वाटेत एक ग्रुप दिसला त्यांनी सांगितल कि तिथेच वाटेत गुप्त भीमाशंकर आहे. मग काय तिघांचे एक मत झाले परत कोण येणार आहे म्हणून आम्ही ते गुप्त भीमाशंकर पाहायला निघालो.


दर्शन घेतले आणि पुन्हा भीमाशंकर च्या दिशेने निघालो पण त्या ग्रुप मधल्या कोणीतरी सांगितलेले आठवले कि सावकाश जा तुम्हाला शेकरू दिसू शकतात. शेकरू म्हणजे Indian Giant Squirrel. मग काय आम्ही पण दबक्या पाउलानी निघालो आणि आम्हाला सुद्धा शेकरू चे अगदी जवळून दर्शन झाले.



त्याचा तेजस भाऊंनी न घाबरता व्हिडिओ पण काढला. आणि ट्रेक सार्थकी लागल्याचे समाधान चेहऱ्यावर दाखवून पुढे निघालो. आम्हला भीमाशंकरच्या मंदिरात पोहचायला साधारण दुपारचे १२ वाजले होते. आम्ही ३:३० - ४:०० तास पाय पीट केल्यावर आम्हाला भीमाशंकराचे दर्शन झाले.
मग आम्ही आधी पेटपूजा केली आणि मग बस ची चौकशी केली म्हंटले ते एक तासाने येईल पण ती काही आली नाही शेवटी आम्ही निर्णय घेतला कि परत जितक शक्य आहे तितक पाई जाऊ आणि आम्ही निघालो सुद्धा पण वाटेत गर्दी खूप असल्याने बस अडकल्याचे दिसले म त्यांना विनवणी करून कसे बसे गाडीमध्ये चढलो आणि आमचा पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास चालू झाला. ह्यात पण नशीब रुषी चे भंगार घरी येई पर्यंत तेज्या भाऊंनी ह्याच्या डोक्याचे खोबरे केले होते. ह्यांच्या सोबत खूप मजा आली आयुष्यभरासाठी नवीन शिदोरी मिळाली. परत लवकरच तुमच्या सोबत नवीन किल्ल्यावर जाण्याची संधी मिळो.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणेस्टेशन ते कासारवाडी (रेल्वे) १०/-
नाशिक फाटा ते राजगुरुनगर ६०/-
राजगुरुनगर ते भोरगिरी ७०/-
एकूण खर्च १४०/-

परतीचा एकाचा खर्च :
भीमाशंकर ते पुणे १५५/-
एकूण खर्च १५५/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
भोरगिरी किल्ला चढाई ला अवघड नाही.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, पण पाणी असते, भोरगिरी ते भीमाशंकर हा ऐक दिवसात ४ ते ५ तासात पूर्ण ट्रेक होतो.
पावसाळ्यात हा ट्रेक उत्तम आहे पण जंगल दाट असल्याने सरपटणारे प्राणी ह्यांची काळजी घेऊनच जावे.
भीमाशंकर हे अभयारण्य असल्याने आपण पुरेशी काळजी घेण गरजेच आहे.
भोरगिरी ते भीमाशंकर रात्री हा ट्रेक करू नये.
भीमाशंकर वरुन पुणे सारख्या बसेस आहेत पण सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी असल्याने चौकशी करावी.
फक्त भोरगिरी ला तुम्ही कधीही जाऊ शकता पण भोरगिरी ते भीमाशंकर जंगलातून करायचा असल्यास वाटाड्या सोबत घ्यावा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )